निकालाची उत्सुकता शिगेला

By Admin | Updated: May 14, 2014 23:55 IST2014-05-14T23:36:38+5:302014-05-14T23:55:33+5:30

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या चोवीस तासांवर आली असल्याने नागरिकांत याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

The excitement of the result is Shigella | निकालाची उत्सुकता शिगेला

निकालाची उत्सुकता शिगेला

उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या चोवीस तासांवर आली असल्याने नागरिकांत याबाबत कमालीची उत्सुकता आहे. मागील ३५ वर्षे सातत्याने विजयाचा गुलाल अंगावर घेणारे डॉ. पद्मसिंह पाटील निसटती बाजी मारतात की मोदी लाटेवर स्वार होऊन सेनेचे रवींद्र गायकवाड यांना दिल्लीचे तिकिट मिळते, याबाबत गोळाबेरीज सुरू आहे. अपक्ष रोहन देशमुख आणि बसपाचे अ‍ॅड. पी. आर. ढाले किती मतांपर्यंत मजल मारतात, यावरही निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात मोठी चुरस होती. त्यामुळेच यावेळी विक्रमी ६४.४१ टक्के एवढे मतदान झाले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सात टक्के मतदान वाढले आहे. हे मतदान नेमके कोणाच्या पारड्यात गेले, याबाबतही उत्सुकता आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात राष्टÑवादी काँग्रेससाठी एकतर्फी वाटत असलेली ही लढत नंतरच्या काळात कमालीची चुरस वाढवत गेली. यामध्ये मोदी फॅक्टर महत्त्वपूर्ण राहिला. लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची तगडी यंत्रणा होती. दुसरीकडे महायुतीने यंदा जिंकण्याच्याच इर्षेने प्रचार केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे या प्रमुख नेत्यांच्या सभा वगळता महायुतीची मदार स्थानिक नेत्यांवरच होती. मात्र, यावेळी कधी नव्हे ती मोदी लाट शहरासह ग्रामीण भागातही दिसून आली. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित असल्याचे व मोठ्या फरकाने प्रा. रवींद्र गायकवाड निवडून येतील, असा दावा महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोदी लाट मान्य करीत असले तरी मागील पाच वर्षे डॉ. पद्मसिंह पाटील व राणाजगजितसिंह पाटील यांनी मतदारसंघात ठेवलेला दांडगा जनसंपर्क तसेच मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे या बळावर आघाडीला निसटते का होईना; यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणार्‍या मतमोजणीकडे मतदारसंघातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) कोण कोणाला रोखणार ? आघाडी विरूध्द महायुती अशी थेट लढत झाली असली तरी या निवडणुकीत अपक्ष उमेदवार रोहन देशमुख आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अ‍ॅड. पी. आर. ढाले यांनीही मतदारसंघात मोठा जोर लावला होता. हे दोन प्रमुख उमेदवार कुठपर्यंत मजल मारतात, यावरही निवडणूक निकालाचे गणित अवलंबून राहणार आहे. प्रारंभी महायुतीची मते खेचण्यासाठीच देशमुख रिंगणात असल्याचा आरोप होत होता. मात्र, अखेरच्या टप्प्यात देशमुख यांनी महायुतीबरोबरच आघाडीचीही मते खेचल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तर बसपाच्या ढाले यांनीही मतदारसंघात तगडी यंत्रणा लावली होती. त्यामुळेच प्रत्यक्ष मतदानावेळी अनेक बुथवर ढालेंचा हत्तीही सुसाट सुटल्याचे चित्र होते. त्यामुळे ढालेही लक्षणीय मते घेऊ शकतात. त्यामुळे याचा फटका आघाडीला बसेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. लोकसभा निवडणुकीत २७ उमेदवार आपले नशीब अजमावीत असले तरी मतदारसंघात महायुती विरूध्द आघाडी अशी थेट दुरंगी लढत झाली. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा सात टक्क्यांनी मतदान वाढले आहे. हे वाढीव मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. नवमतदारांनी मोदी लाटेमुळे महायुतीला कौल दिल्याचा दावा होत आहे. दुसरीकडे विरोध मात्र वाढीव मतदानातील मोठा हिस्सा आघाडीच्या पारड्यात पडल्याचे सांगत आहेत. या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे पुरूष मतदारांपेक्षा यंदा महिला मतदानाचे प्रमाण एक टक्क्यांनी अधिक होते. या महिलांनी नेमका कोणाच्या बाजुने कौल दिला, हेही पहावे लागणार आहे. ...तर विधानसभा निवडणुकीत उलथापालथ महायुती यंदा प्रथमच रिपाइं आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना सोबत घेऊन निवडणूक रिंगणात उतरली होती. तर राष्टÑवादी काँग्रेसनेही काँग्रेसशी जुळवून घेत एकत्रितरीत्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. निवडणूक निकालानंतर महायुती आणि आघाडी प्रत्यक्षात किती भक्कम होती, याचे चित्र पुढे येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची चर्चा असतानाच अनेकांनी तोंडावर आलेल्या विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशा स्थितीत निवडणूक निकालातून आलेली आकडेवारी विधानसभेचे गणित बिघडवणारी ठरू शकते. मतमोजणीतून बुथनिहाय नेमके कोणाला किती मतदान मिळाले, हे स्पष्ट होणार असल्याने उमेदवाराला नेमका कुठे दगा-फटका झाला, तेही उघड होणार आहे.

Web Title: The excitement of the result is Shigella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.