माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची उत्साहात सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:29 IST2020-12-17T04:29:14+5:302020-12-17T04:29:14+5:30
यावर्षीचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे कार्तिकी काला यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करून ...

माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याची उत्साहात सांगता
यावर्षीचा संजीवन समाधी सोहळा म्हणजे कार्तिकी काला यावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने सर्व नियमांचे पालन करून सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. टाळ- मृदंगाच्या निनादाने आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात आपेगावनगरी दुमदुमून गेली. या सोहळ्याच्या निमित्ताने आपेगाव येथे मागील सात दिवसांपासून हरिनाम सप्ताह सुरू होता. यात हरिकीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण यासारखे कार्यक्रम पार पडले. कोरोनामुळे यंदाची यात्रा रद्द करण्यात आली होती. संत ज्ञानेश्वर मंदिरात फुलांची सजावट व परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गोदाकाठावर रविवारी भल्या पहाटेपासूनच भविकांनी स्नान करून माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी रोहयोमंत्री संदीपान भुमरे, विलास भुमरे, नंदलाल काळे, संजय वाघचौरे, दत्ता गोर्डे, ज्ञानेश्वर कापसे, कारभारी लोहकरे, किशोर दसपुते, नामदेव खरात, दीपक मोरे, एकनाथ नरके, शंकरराव काळे यांनी माऊलींचे दर्शन घेतले. दुपारी सदानंद महाराज मगर व रामेश्वर महाराज देशमुख यांच्या भजन जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे इंद्रधनू कला मंच, मुंबई यांच्या वतीने कत्थक नृत्य व संगीत भजन पार पडले.
चौकट
भाविकांसाठी चहा, फराळ, रोगनिदान शिबिर
संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध सामाजिक संघटना व ग्रामस्थांच्या वतीने भविकांसाठी चहा-फराळाची सोय करण्यात आली होती. यासह मोफत सर्वरोग चिकित्सा व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर व मंदिर संस्थानच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
फोटो : आपेगाव येथे ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या समाप्तीस भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. काल्याचे कीर्तन करताना ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर.