मराठा क्रांती मोर्चा धडकणार मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:15 IST2017-11-03T01:15:21+5:302017-11-03T01:15:27+5:30
मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे धोरण काय, यासाठी जाब विचारण्यास मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रांतीचौैकात भेटणार आहेत,

मराठा क्रांती मोर्चा धडकणार मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे धोरण काय, यासाठी जाब विचारण्यास मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक ४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना क्रांतीचौैकात भेटणार आहेत, अशी माहिती समन्वयकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
समन्वयक म्हणाले की, कोपर्डीतील पीडितेला न्याय द्या, मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण द्या, शेतकºयांना सरसकट कर्जमाफी करावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, आदी मागण्यांसाठी गतवर्षीपासून सुमारे ७० मूक मोर्चे निघाले. रास्ता रोकोसारखे जनआंदोलनही समाजाने केले. यानंतरही समाजाच्या मागण्या जैसे थे आहेत. राज्य सरकारने केवळ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नियुक्त केली. मराठा समाजाला आश्वासन देऊन शासन झुलवत ठेवत आहे, अशी भावना समाजाची झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक गुरुवारी सिडकोतील एका मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ नोव्हेंबर रोजी एका कार्यक्रमासाठी औरंगाबादेत येत असल्याने कार्यक्रमस्थळी जाऊन त्यांना समाजाच्या मागण्यांचे काय झाले, याबाबत जाब विचारण्याचा निर्णय झाला. मराठा समाजातील शेकडो लोक, तरुण, तरुणी यावेळी उपस्थित राहतील. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्यांसंदर्भात शासनाचे धोरण स्पष्ट करावे, असा आमचा आग्रह राहणार आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.