त्या कुपोषित बालिकेची रुग्णालयातही फरफटच !
By Admin | Updated: July 14, 2014 01:00 IST2014-07-13T23:13:52+5:302014-07-14T01:00:19+5:30
माजलगाव : तालुक्यातील मोगरा येथील श्रावणी विश्वनाथ शिंदे ही मुलगी जन्मत:च कुपोषित आहे. ती आता दोन वर्षाची आहे.

त्या कुपोषित बालिकेची रुग्णालयातही फरफटच !
माजलगाव : तालुक्यातील मोगरा येथील श्रावणी विश्वनाथ शिंदे ही मुलगी जन्मत:च कुपोषित आहे. ती आता दोन वर्षाची आहे. या कुपोषित मुलीबद्दल बालविकास प्रकल्प अधिकारी व आरोग्य विभागाला खबरही नव्हती. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने श्रावणीला अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केलेले आहे. परंतु तिथेही तिला म्हणावा तसा उपचार मिळत नसल्याने कुपोषित श्रावणीची फरफटच सुरू आहे. तिच्या उपचारासाठी लागणारी औषधे बाहेरून आणावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
विश्वनाथ शिंदे यांना तीन मुली असून सर्वात लहान म्हणजे श्रावणी ही आहे. शिंदे यांची परिस्थिती हलाखीची असूनही त्यांनी श्रावणीवर एक-दोन वेळेस उपचार केले . शनिवारी श्रावणी व तिची आजी काही कारणास्तव माजलगावला आले असता ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आली़ त्यांनी तिला पुढील उपचारासाठी स्वाराती रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तेथेही तिची फरफटच होत असून उपचारासाठी लागणारी औषधे बाहेरून आणण्यास सांगितले जात आहेत़ यामुळे शिंदे कुटुंबियांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पैशाअभावी श्रावणीची प्रकृती दिवसेंदिवस खालावतच चालली आहे, असे श्रावणीच्या नातेवाईकांनी सांगितले. आणखी दोन दिवस उपचार करू व नंतर तिला घरी घेऊन जाऊ असे तिचे नातेवाईक हरिभाऊ शिंदे म्हणाले़ (वार्ताहर)
आरोग्य विभागाला गांभीर्य नाही
आगोदर माजलगाव आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आता अंबाजोगाईच्या स्वरातीमधील डॉक्टर याकडे दुर्लक्ष करीत आहेत यावरून आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नसल्याचा आरोप होत आहे.