इतिवृत्त पडून तरी सभांवर सभा सुरू
By Admin | Updated: October 13, 2016 01:11 IST2016-10-13T00:41:59+5:302016-10-13T01:11:33+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तालाच मागील सात ते आठ महिन्यांपासून मंजुरी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

इतिवृत्त पडून तरी सभांवर सभा सुरू
औरंगाबाद : महापालिकेच्या पार पडलेल्या सर्वसाधारण सभांच्या इतिवृत्तालाच मागील सात ते आठ महिन्यांपासून मंजुरी घेण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नगरसचिव विभाग या विलंबाला अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत असले तरी खरे कारण वेगळेच असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे.
नियमानुसार महापालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्याच्या २० तारखेपूर्वी घेण्यात येते. प्रत्येक सभेत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येतात. नगरसेवकही आपापल्या वॉर्डातील विकासासाठी अशासकीय ठराव ठेवून मंजूर करून घेतात. चालू महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त पुढील महिन्याच्या सर्वसाधारण सभेत यावे, असे अनिवार्य असते. नव्हे सभेच्या विषयपत्रिकेवरील पहिला विषय हा मागील सभेच्या इतिवृत्ताला मंजुरी हाच असतो. इतिवृत्ताला मंजुरी देऊनच नवीन विषयावर चर्चा होते. इतिवृत्ताला मंजुरी दिल्याशिवाय त्या कामकाजाला कायदेशीर रूप प्राप्त होत नाही. परंतु महापालिकेत या नियमाला फाटा देण्याचे काम अलीकडे सुरू झाले आहे. मार्च २०१६ पासून अनेक सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त मंजुरीविना पडून आहेत. काही सर्वसाधारण सभांचे इतिवृत्त तयार करण्यात आले असले तरी सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणण्यात आलेले नाही. इतिवृत्त मंजुरीसाठी न आणण्याचे कारण काय, अशी चर्चा आता मनपा वर्तुळात सुरू आहे.
पदाधिकाऱ्यांनीच हे इतिवृत्त मंजुरीविना दडवून ठेवल्याचेही बोलल्या जात आहे. महापौर-उपमहापौरांचा कार्यकाळ आॅक्टोबरअखेर संपत आहे. त्यापूर्वी या इतिवृत्तांमध्ये काही ठराव घुसडण्याची शक्यता राजकीय मंडळींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
आज मनपाची सर्वसाधारण सभा
गुरुवारी (दि. १३) मनपाची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत प्रशासनातर्फे मालमत्ता कराच्या नियमावलीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. मनपाने तयार केलेल्या नवीन नियमावलीवर सभेत गरमागरम चर्चा अपेक्षित आहे. नगरसेवकांकडूनही अनेक अशासकीय प्रस्ताव सभेत मांडण्यात आले आहेत.
सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त तयार करण्याचे काम नगरसचिव विभागाकडून होते. नगरसचिव विभाग हा प्रशासनाचा एक भाग आहे. त्यांच्याकडे इतिवृत्त तयार करण्यासाठी मनुष्यबळाचा अभाव आहे. काही सभांचे इतिवृत्त रखडले आहेत. जे तयार असतील ते सुद्धा लवकरच मंजूर करून सदस्यांच्या हाती देण्यात येतील. इतिवृत्त पेंडिंग ठेवण्याचा काहीच विषय नाही.
त्र्यंबक तुपे, महापौरमहापालिका अधिनियमाच्या नियम क्रमांक ५ मधील प्रकरण २ मध्ये सभा कामकाज नियमावलीवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त शक्यतो पुढील सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेत असावे, असे अपेक्षित आहे. नियमावलीत ‘शक्यतो’ या शब्दाचा सोयीस्कर अर्थ काढून औरंगाबाद महापालिकेने अनेक सभांचे इतिवृत्त दडवून ठेवले आहे. सहा ते आठ महिन्यांपूर्वीच्या सभांमध्ये कोणते ठराव मंजूर झाले हे असंख्य नगरसेवकांच्याही लक्षात असण्याचे कारण नाही. प्रत्येक सभेचे इतिवृत्तही अनेकजण वाचत नाहीत. याचाच फायदा घेऊन राजकीय मंडळी मंजूर न झालेले विषय सोयीस्करपणे टाकू शकतात.
सर्वसाधारण सभा सुरू असताना नगरसेवकांकडून ऐनवेळीचा प्रस्ताव अजिबात घेता येत नाही. महापालिका सभा कामकाज नियमावलीच्या अनुसूची ड मधील प्रकरण २ मध्ये ऐनवेळीचा प्रस्ताव घेऊ नये असे म्हटले आहे.
४स्थायी समिती आणि मनपा आयुक्तांकडून आलेला प्रस्ताव ऐनवेळी म्हणून घेता येऊ शकतो. पूर्वी मनपात या नियमांचे कोटेकोर पालन होत होते.
४आता सभा सुरू असतानाच ऐनवेळीचे विषय राजरोसपणे घेण्यात येतात आणि मंजूरही होतात.
नगर सचिव विभागाकडे पूर्वी मनुष्यबळ नव्हते. आता काही कर्मचारी वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रलंबित इतिवृत्त तयार करण्यात आले आहेत. पदाधिकाऱ्यांकडे हे इतिवृत्त मंजुरीसाठी पाठवूनही दिले आहेत. तीन ते चार सभांचे इतिवृत्त तयार करण्याचे काम सध्या सुरू असून, लवकरच हे कामही संपणार आहे.
दिलीप सूर्यवंशी, नगर सचिव, मनपा