बंदी असतानाही कर्नाटकी गुटख्याचा देवणीकरांना लळा
By Admin | Updated: June 9, 2014 00:07 IST2014-06-08T23:34:06+5:302014-06-09T00:07:53+5:30
रमेश कोतवाल , देवणी देवणी शहरासह तालुक्यात सध्या गुटखा बंदीचा पुर्णत: बोजवारा उडाला.

बंदी असतानाही कर्नाटकी गुटख्याचा देवणीकरांना लळा
रमेश कोतवाल , देवणी
देवणी शहरासह तालुक्यात सध्या गुटखा बंदीचा पुर्णत: बोजवारा उडाला असून, मोजके दुकाने सोडले तर सर्वच दुकाने, पानटपऱ्या, हातगाडे, हॉटेल आदी ठिकाणी महागड्या किंमतीत राजरोसपणे गुटखा विक्री सुरु झाली आहे़ सदर गुटखा हा शेजारच्या कर्नाटकातून रात्रीअपरात्री मोठ्या प्रमाणात येत आहे़ या सर्व प्रकाराकडे अन्न व भेसळवाल्यांना जिल्ह्याहून येऊन येथे पाहण्याची साधी तसदी सुद्धा घ्यावेसे वाटत नाही़
या उलट सध्या या गुटखा विक्रीवाल्यांची हिम्मत इतकी वाढली आहे की, १७ मे रोजी येथील एका होलसेल गुटखा विक्रेत्याने एका पोलिस शिपायास मोबाईलवरून चांगलेच धमकावले असून याची लेखी नोंद ठाण्यात पोलिसांनी केली आहे़ मात्र कार्यवाही काहीच नसल्याने गुटखा विक्रीवाले चांगलेच निर्ढावले आहेत़ सध्या शहरात किमान दोन डझन तरी गुटखा पुरवठा होतो़ तर किमान दीड दोनशे किरकोळ विक्रेते असल्याचे दिसते़ शहराप्रमाणे तालुक्यातील बोरोळ, दवणहिप्परगा, वलांडी, धनेगाव, जवळगा, हेळंब, तळेगाव, सावरगाव, तोगरी क्रॉससह प्रत्येक गावात गुटखा विक्री सुरु असून यात गोवा व गितांजली गुटख्याची विक्री जास्त आहे़
तालुक्यात किमान एक लाखाचा दररोज गुटखा विकला जात असल्याची व लहान बालके खाण्याचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे़ गुटखा बंदी असल्याने भेसळ गुटख्याचे प्रमाण जास्त वाढल्याने तोंडाचे विकार, अलीकडे युवकात वाढले आहेत़ विशेष म्हणजे अन्न व भेसळ अधिकारी येथे येतात व किरणा दुकानाची जुजबी तपासणी करतात़
कहर म्हणजे नकाशात दाखवलेल्या जागा आणि इमारतीपेक्षा जादा जागा व इमारतीत बार चालवून नियम धाब्यावर बसवले जात आहेत़ ग्राहकांकडून आधिकचे पैसे घेतले जात आहे़
बारवाल्यांकडून नियम धाब्यावऱ़़
देवणी येथील बियरबार शासनाचे सर्व नियम व अटी धाब्यावर बसवत शासनाच्या लुटीसोबतच ग्राहकांची पण मोठी गैरसोय करीत अर्थिक लुबाडणूकपण करीत आहेत़ शिवाय या ठिकाणी बाल कामगारांचा व बालग्राहकांचा पण मोठा वर्ग झाल्याने सर्वच मामला मुकी बिचारी कुणीही हाका अशी झाली आहे़
नियमाप्रमाणे प्रत्येक बारमध्ये स्वच्छतागृह व प्रत्येक कॅबीन व किचन इतर ठिकाणे स्वच्छ असायला पाहिजेत़ मात्र कॅबीन व किचन उकिरड्याप्रमाणे घाण आहेत़ तर काही बारमध्ये स्वच्छतागृहे मुळात नाहीतच यामुळे ग्राहकांना नको त्या अवस्थेत रस्त्यावरच येऊन कार्यभाग उरकतात़ शिवाय काही बार रहदारीच्या रस्त्यावरच असल्याने अपघाताचे प्रमाणपण दिवसेंदिवस वाढतच आहे़