अंदाज समिती हिंगोलीत दाखल
By Admin | Updated: July 6, 2017 23:22 IST2017-07-06T23:20:22+5:302017-07-06T23:22:01+5:30
हिंगोली : परभणी जिल्ह्याचा दौरा आटोपून अंदाज समिती हिंगोलीच्या दौऱ्यावर आली आहे.

अंदाज समिती हिंगोलीत दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : परभणी जिल्ह्याचा दौरा आटोपून अंदाज समिती हिंगोलीच्या दौऱ्यावर आली आहे. जवळपास दहा ते बारा आमदारांसह मंत्रालयीन अधिकारी व स्थानिक अधिकाऱ्यांचा मोठा लवाजमा हिंगोलीच्या विश्रामगृहावर जमल्याने एकच गर्दी झाली होती. वाळू व सा.बां.ची कामे या बाबींकडे अधिकचा कटाक्ष असल्याचे सूत्रांकडून कळाले.
हिंगोली जिल्ह्यात अंदाज समिती येणार असल्याने मागील काही दिवसांपासून त्यादृष्टिने प्रशासकीय यंत्रणा तयारी करताना दिसत होती. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. या समितीनेही आधीच प्रश्नावली पुरविली होती. त्यानुसार त्या-त्या विभागांनी आढावाही सादर केलेला आहे. त्यात दुष्काळ काळातील उपाययोजना, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरि पुरवठा, गौण खनिज आदी बाबींच्या माहितीचा समावेश आहे. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही समिती हिंगोलीत दाखल झाली. त्यानंतर त्यांनी विविध विभागाच्या प्रमुखांशी विश्रामगृहात चर्चा केली. त्यात प्रामुख्याने जिल्ह्याच्या विकासाच्या परिस्थितीचा मुद्दा होता. त्यानंतर ही बैठक आटोपली. त्यामुळे आता ७ रोजी ही समिती पुन्हा कामाला लागणार आहे. परभणीत या समितीच्या तपासणीत अनेकांचे पितळ उघडे पडले. काहींना निलंबितही करण्यात आले आहे. आता हिंगोलीत त्यामुळे आधीच धडकी भरलेली आहे. बैठकीनंतर बाहेर जमलेला ताफा याच विवंचनेत असल्याचे दिसून येत होता. परभणीतच अंदाज समितीच्या कठोर भूमिकेचा आता बरोबर अंदाज प्रशासनालाही आला आहे. त्यामुळे काहींनी तर देव पाण्यात घातले आहेत. उद्या तपासणीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.