अत्यावश्यक सेवाही होणार बंद
By Admin | Updated: June 2, 2014 01:05 IST2014-06-02T01:02:14+5:302014-06-02T01:05:18+5:30
नांदेड : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मे पासून आंदोलन सुरु केले आहे़

अत्यावश्यक सेवाही होणार बंद
नांदेड : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने आपल्या मागण्यांसाठी २६ मे पासून आंदोलन सुरु केले आहे़ शनिवारी जिल्हाकचेरीसमोर निदर्शने केल्यानंतर सोमवारपासून आता अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात येणार आहे़ त्यामुळे रुग्णांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत़ मॅग्मोने यापूर्वीच आंदोलनाच्या संदर्भात राज्य शासनाला कळविले होते़ परंतु शासनाकडून अद्यापही त्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत भूमिका घेण्यात आली नाही़ त्यामुळे २६ मे पासून सुरु झालेले आंदोलन आता निर्णायक वळणावर येवून पोहचले आहे़ २६ मे पासून काळ्या फिती लावून काम करण्यात आले होते़ त्यानंतर शासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार घालण्यात आला़ मॅग्मोने शासनाला मागण्या मंजूर करण्यासाठी ३१ मे ची डेडलाईन दिली होती़ त्यानुसार शनिवारी जिल्हाकचेरीसमोर वैद्यकीय अधिकार्यांनी धरणे आंदोलन केले़ आता मात्र सोमवारपासून अत्यावश्यक सेवाही बंद करण्यात येणार आहेत़ त्यात बाह्यरुग्ण, आंतररुग्ण विभागातील सेवांवर बहिष्कार घालण्यात येणार आहे़ परंतु एमएलसी आणि शवविच्छेदन विभागाची कामे मात्र करण्यात येणार आहे़ त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी २ दोन वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्य संघटक डॉ़उत्तम इंगळे, डॉ़शेख बालन, डॉ़प्रताप चव्हाण, डॉ़निळकंठ भोसीकर, डॉ़राजेंद्र पवार यांनी दिली़ वैद्यकीय अधिकार्यांच्या या आंदोलनामुळे सोमवारपासून मात्र रुग्णांचे प्रचंड हाल होणार असून त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही़ (प्रतिनिधी) एड्स नियंत्रण संघटनाही उद्यापासून संपावर वैद्यकिय अधिकार्यांनी पुकारलेल्या आंदोलनास महाराष्ट्र राज्य एड््स नियंत्रण संघटेनच्या नांदेड शाखेने पाठिंबा दिला आहे़ राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यात जवळपास २५०० कर्मचारी कंत्राटी तत्वावर १० ते १२ वर्षापासून कार्यरत आहेत़ या कर्मचार्यांच्या मागण्याकडे शासनाने दुर्लक्षच केले आहे़ या कर्मचार्यांना कायम करण्याची मागणी संघटनेने केली आहे़ संघटनेचे अध्यक्ष प्रविण गुजर, विशाल कांबळे, अमोल पाडोळीकर, अंबिका कुलकर्णी, सुनिता वावळे, संतोष वाडीकर, इरफान सय्यद, माधव अल्लापूरे, अभिनंदन पांचाळ आदींनी केली़ या मागणीसाठी जिल्ह्यातील कर्मचारी ३ जूनपासून संपावर जात आहेत़