उद्योजकाला थाळीची ऑर्डर दीड लाखाली पडली; ऑनलाईन भामट्याने केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 19:42 IST2021-06-05T19:41:37+5:302021-06-05T19:42:32+5:30
cyber crime : मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगून दीड लाख रुपये ऑनलाईन पळवले

उद्योजकाला थाळीची ऑर्डर दीड लाखाली पडली; ऑनलाईन भामट्याने केली फसवणूक
औरंगाबाद : फेसबुकवर नंबर शोधून ऑनलाईन थाळीची ऑर्डर देण्यासाठी कॉल करणे उद्योजकाला दीड लाखात पडले. त्यांच्या नंबरवर कॉल करुन सायबर भामट्याने त्यांना डेबिट कार्डवरुन दहा रुपये पाठविण्यास आणि anyDesk नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करायाला सांगून त्यांच्या खात्यातून १ लाख ५० हजार ६९४ रुपये काढून घेऊन फसवणूक केली. हा प्रकार समोर आल्यावर उद्योजकाने पोलिसांत धाव घेतली.
प्राप्त माहितीनुसार तक्रारदार ऋषिकेश मोहन चव्हाण (रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, गारखेडा) यांचा वसमत (जि. परभणी) येथे जैविक खताचा कारखाना आहे. काही महिन्यापासून ते औरंगाबादेत राहात आहेत. ४ जून रोजी त्यांनी फेसबुकवर भोज थालीचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि त्या क्रमांकावर कॉल केला. तेव्हा त्यांचा फोन स्विकारण्यात आला नाही. मात्र, काही मिनिटांनी त्यांना अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. तुमची ऑर्डर घेण्यासाठी तुमच्या डेबिट कार्डवरुन दहा रुपये पाठवावे लागेल. ही रक्कम तुम्हाला लगेच परत केली जाईल, असे सांगितले. यामुळे चव्हाण यांनी लगेच त्याने दिलेल्या क्रमांकावर ऑनलाईन १० रुपये पाठवले. ही रक्कम पाठविल्यावर त्याने तुमचे पैसे परत करण्यासाठी दोन ओटीपी क्रमांक पाठविले आहेत. ते सांगा असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून चव्हाण यांनी त्या अनोळखी व्यक्तीला ओटीपी क्रमांक सांगितले. यानंतर चव्हाण यांच्या खात्यातून २० हजार १०० रुपये, २५ हजार ९७७ रुपये आणि ४९ हजार ९९९ रुपये परस्पर काढून घेतले. याचे मेसेज तक्रारदार यांना प्राप्त होताच त्यांनी त्या अनोळखी मोबाईलधारकाला कॉल केला असता त्याने ही रक्कम चुकून त्याच्या खात्यात वर्ग झाली. ही सर्व रक्कम तुम्हाला परत करतो तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये anydesk हे ॲप्लिकेशन्स डाउनलोड करा, असे त्याने सांगितले. तक्रारदार यांनी लगेच हे ॲप्लिकेशन डाउनलोड करताच आरोपीने आणखी रक्कम परस्पर काढून फसवणूक केली. हा प्रकार लक्षात येताच चव्हाण यांनी सायबर ठाणे आणि पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या सल्ल्याने त्यांनी लगेच त्यांच्या मोबाईलमधील anydesk ॲप्लिकेशन डीलिट केले .
आजही भामट्याचे कॉल
तक्रारदार यांच्या खात्यात पैसे असल्याचे समजताच तक्रारदार यांना आरोपीने शनिवारी पुन्हा कॉल करून रक्कम परत करण्याची ग्वाही दिली. आणि anyDesk अप्लिकेशन डाउनलोड करायचे सांगितले. त्यांनी त्याला नकार देताच आरोपीने दुसऱ्या क्रमांकावरुन कॉल करून तो बॅंकेचा अधिकारी बोलत असल्याचे म्हणाला. तुमचे काल गेलेली रक्कम परत मिळविण्यासाठी ओटीपी पाठवत आहे तो ओटीपी क्रमांक सांगा असे म्हणाला. मात्र चव्हाण यांनी त्यांना आज प्रतिसाद दिला नाही.