उद्योजकाचा बंगला फोडला

By Admin | Updated: November 5, 2016 01:37 IST2016-11-05T01:21:01+5:302016-11-05T01:37:21+5:30

वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात चोऱ्याचे सत्र सुरूच असून, दिवाळी सणासाठी गावी गेलेल्या एका उद्योजकाचा ए. एस

The entrepreneur's bungalow broke | उद्योजकाचा बंगला फोडला

उद्योजकाचा बंगला फोडला


वाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरात चोऱ्याचे सत्र सुरूच असून, दिवाळी सणासाठी गावी गेलेल्या एका उद्योजकाचा ए. एस. क्लबजवळील बंगल्यात चोरी झाल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
सचिन अशोक सेठ (रा. तापडिया इस्टेट बी-५) हे लघु उद्योजक असून, त्यांच्या नवीन घराचे काम सुरू आहे. घराच्या बांधकामावर देखरेख व्हावी, यासाठी सचिन सेठ यांनी लगतचा सतीश कोठारे यांचा बंगला भाड्याने घेतला आहे. सचिन सेठ हे २८ आॅक्टोबरला कुटुंबासह दिवाळी सणानिमित्त बंगल्याला कुलूप लावून घराबाहेर पडले होते.
सतीश कोठारे यांच्या उद्यानातील झाडांना पाणी देण्यासाठी आज शुक्रवारी मोलकरीण आली होती. सचिन सेठ यांच्या बंगल्याच्या आवारात वर्तमानपत्रे अस्ताव्यस्त पडलेली त्यांना दिसली.
मोलकरणीने सर्व वर्तमानपत्रे जमा करून सेठ यांच्या बंगल्याजवळ आणून ठेवली असता त्यांना बंगल्याचे कुलूप तुटलेले दिसले. मोलकरणीने हा प्रकार बंगला मालक सतीश कोठारे यांना सांगितला. कोठारे यांनी एमआयडीसी वाळूज पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
श्वान पथक व ठसे तज्ज्ञाला पाचारण
चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले. मात्र श्वान पथकाला चोरट्यांचा माग काढता आला नाही. ठसे तज्ज्ञांनी वस्तूंचे ठसे घेतले. एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे फौजदार अमोल देशमुख, धुमाळ, पटाईत, बुट्टे आदींच्या पथकाने भेट देऊन पाहणी केली.
लोखंडी टॉमीने कुलूप तोडले
माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी सचिन सेठ यांच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला व कुलूप लटकलेले होते.
पोलीस पथकाने बंगल्यात प्रवेश करून पाहणी केली. बंगल्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. चार कपाटाचे लॉकर उचकटून चोरट्यांनी आतील कपड्यांची झडती घेऊन किमती वस्तू व रोख रक्कम चोरल्याची शक्यता आहे.

Web Title: The entrepreneur's bungalow broke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.