विद्यापीठाचे संपूर्ण नियोजनच कोलमडले
By | Updated: November 28, 2020 04:16 IST2020-11-28T04:16:52+5:302020-11-28T04:16:52+5:30
औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणखी किमान दहा दिवस तरी विद्यापीठात येऊ शकत नाहीत. ...

विद्यापीठाचे संपूर्ण नियोजनच कोलमडले
औरंगाबाद : कुलगुरू डॉ. प्रमोद येवले हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणखी किमान दहा दिवस तरी विद्यापीठात येऊ शकत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाची यंत्रणा सुस्तावली आहे. दिवाळीपूर्वी जाहीर होणारे बहुतांश पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही लागलेले नाहीत. एम.फिल.ची प्रवेशपूर्व परीक्षा झाली. मात्र, पदव्युत्तर विभागाच्या निकालाअभावी ही प्रवेश प्रक्रियाही आता लांबणीवर पडली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एम.फिल. अभ्यासक्रमासाठी २० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सीईटी घेतली. दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबरला सीईटीचा निकाल जाहीर झाला. मात्र, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निकालाअभावी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही. दुसरीकडे, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी एम.फिल. प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून अनेकांनी ऑनलाइन अर्जावर ‘एसईबीसी’ प्रवर्ग नमूद केला होता. मात्र, राज्य शासनाने या विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ ऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तथापि, विद्यार्थी संघटनांच्या मागणीनुसार या विद्यार्थ्यांना आर्थिक मागास प्रवर्गातून प्रवेशाचा लाभ देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे अगोदर ऑनलाइन अर्जात नमूद प्रवर्गात दुरुस्ती करणे व प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विद्यापीठाने वेळापत्रकात बदल केला आहे.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एम.फिल. प्रक्रियेसंदर्भात बैठक झाली. त्या बैठकीत ‘एसईबीसी’ प्रवर्गातील अनेकांनी आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ मागितली. दुसरीकडे, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अनेक विषयांच्या निकालास विलंब झाला आहे. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे गुण ऑनलाइन नोंद करण्यासाठी तसेच ‘ईडबल्यूएस’ प्रवर्गात नोंद करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
चौकट.....
दोन डिसेंबरपर्यंत करता येईल नोंदणी
आता नव्या वेळापत्रकानुसार येत्या २ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येईल. दुसऱ्या दिवशी गुणवत्ता यादी घोषित करण्यात येईल. प्रवेशित विद्यार्थ्यांची पहिली यादी ९ डिसेंबर रोजी घोषित होणार असून, १८ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. नंतरच्या दिवसापासून तासिका सुरू करण्याचा पदव्युत्तर विभागाचा विचार आहे.