अभियंता बनला चोर!

By Admin | Updated: August 24, 2014 01:49 IST2014-08-24T01:21:59+5:302014-08-24T01:49:30+5:30

चोरीकडे वळलेल्या एका मेकॅनिकल इंजिनिअरला गुन्हे शाखा पोलिसांनी काल अटक केली.

Engineer turned thief! | अभियंता बनला चोर!

अभियंता बनला चोर!

औरंगाबाद : एक तर व्यवसायात अपयश आले, पाठोपाठ नोकरी गेली अन् लॉटरीचे व्यसन जडल्याने उरलेसुरले पैसेही संपले. त्यातच आजारपण मागे लागले... अशा या परिस्थितीने चोरीकडे वळलेल्या एका मेकॅनिकल इंजिनिअरला गुन्हे शाखा पोलिसांनी काल अटक केली.
सुनील प्रभाकर धोंडगे (२९, रा. मुदखेड, नांदेड), असे त्या अभियंता असलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून आतापर्यंत चोरीचे पाच लॅपटॉप अन् एक कॅमेरा हस्तगत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या सर्व वस्तू त्याने शहरातील विविध हॉस्पिटल्समधूनच चोरल्या आहेत. उपचार घेण्याचा बहाणा करीत तो हॉस्पिटलमध्ये जायचा आणि संधी साधून डॉक्टरांचे लॉपटॉप व इतर वस्तू चोरी करायचा, असे तपासात उघडकीस आले.
या कारवाईबाबत पोलिसांनी सांगितले की, एक तरुण हा चोरीचा कॅमेरा विक्री करण्यासाठी निराला बाजार परिसरात येणार असल्याची माहिती काल गुन्हे शाखेला मिळाली. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक गजानन कल्याणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी खबऱ्याने सांगितलेले ठिकाण गाठले. तेथे सुनील धोंडगे आला. चोरीचा कॅमेरा विकण्यासाठी आला तो हाच असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘खाक्या’ दाखविताच अखेर त्याने तोंड उघडले. हा कॅमेरा आपण घाटी रुग्णालयातून चोरी केला असून तो एका डॉक्टरचा आहे, अशी त्याचे कबुली दिली. या चोरीप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक विचारपूस केली असता त्याने शहरातील एमजीएम, हेडगेवार व घाटी रुग्णालयातून संगणकाचे मॉनिटर, डॉक्टरांचे काही लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिली.
उपचाराला गेला अन् चोरी...
औरंगाबादेत सुनीलला अपघात झाला. त्यात त्याच्या डोक्याला मार लागला. उपचारासाठी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये गेला. तेथे डॉक्टरच्या कॅबिनमध्ये बसल्यानंतर अचानक डॉक्टर कॅबिनमधून उठून बाहेर गेले. समोर लॅपटॉप पडलेला होता. येथे कुणी नाही, लॅपटॉप चोरला आणि तो विकला तर पैसे मिळतील, आपली उपजीविका तरी भागेल, असा विचार करीत सुनीलने लॅपटॉप उचलला आणि धूम ठोकली. त्यात तो यशस्वी झाला. त्यानंतर त्याने चोरीचा मार्ग आणि त्यासाठी अशीच पद्धत वापरण्यास सुरुवात केली. उपचाराच्या बहाण्याने दवाखान्यात जायचे अन् संधी साधून डॉक्टरचा लॅपटॉप किंवा इतर वस्तू चोरायच्या, असे त्याने सत्रच सुरू केले होते. अशा पद्धतीने त्याने चोरलेले चार लॅपटॉप, एक मॉनिटर व कॅमेरा, असा सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज सुनीलकडून हस्तगत केल्याचे निरीक्षक आघाव यांनी सांगितले.
परिस्थितीमुळे स्वीकारला चोरीचा मार्ग
सगळीकडूनच अपयश
४सुनीलने मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलेले आहे. तो पुण्यात एका चांगल्या कंपनीत मोठ्या पगारावर नोकरीला होता. त्याच काळात त्याने पुण्यातील तेरणे फाटा येथे आइस्क्रीम पार्लर आणि मल्टी सर्व्हिस सेंटर सुरू केले. मात्र, सुरुवातीलाच त्याला व्यवसायात मोठा घाटा झाला. त्यातच त्याची नोकरी गेली. पत्नीही माहेरी निघून गेली.
४एकाच वेळी सगळीकडून संकटात सापडलेल्या सुनीलने झटपट पैसे कमविण्यासाठी लॉटरीचा मार्ग निवडला. त्यात तो होते नव्हते ते सगळेपैसे गमावून बसला. सगळे काही गमावल्यानंतर पुणे सोडून तो औरंगाबादला आला. येथे बजाजनगरात असलेल्या नातेवाईकाच्या खोलीत राहू लागला.
घाटीत धुमाकूळ
आरोपी सचिनने तर घाटी रुग्णालयात धुमाकूळच घातला होता. गेल्या महिनाभरात त्याने घाटी रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली जाऊन तेथील डॉक्टरांचे चार लॅपटॉप चोरी केले होते. लॅपटॉप चोरीच्या या सत्राने डॉक्टर हैराण झालेले होते, हे विशेष.

Web Title: Engineer turned thief!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.