अतिक्रमण हटाव पथकाचा मनपातच ठिय्या

By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T00:51:25+5:302014-07-27T01:18:53+5:30

विकास राऊत, औरंगाबाद महापालिकेचे अतिक्रमण पथक पालिकेला फक्त पोसण्याची वेळ आली आहे.

The encroachment was removed by the squad's heart | अतिक्रमण हटाव पथकाचा मनपातच ठिय्या

अतिक्रमण हटाव पथकाचा मनपातच ठिय्या

विकास राऊत, औरंगाबाद
महापालिकेचे अतिक्रमण पथक पालिकेला फक्त पोसण्याची वेळ आली आहे. या पथकाची कार्यपूर्ती काय, कोणत्या भागात कारवाई करायची. हे सगळे ठरवून दिलेले असताना इमारत क्र.३ मध्येच ते पथक ठाण मांडून असते. त्यांच्या मदतीला देण्यात आलेले पोलीस पथकही अलबेल असून, मर्जीनुसार अतिक्रमण विभागाची मोहीम राबविली जाते. त्यामुळेच आदेश आला तरच पथक इमारत क्र. ३ च्या बाहेर पडते. अन्यथा गप्पाटप्पांच्या मैफलीतच हे पथक रममाण झालेले असते. बेजबाबदारपणा आणि हप्ते वसुलीमध्ये अडकलेला हा विभाग गब्बर होत असून, पालिकेला कंगाल करीत आहे, तर अनधिकृत बांधकामे, हातगाड्यांना अभय देतो आहे.
अतिक्रमणातून अनेकांचा पळ
या विभागात काम करणे म्हणजे डोकेदुखी आहे, असे समजून अनेक इमारत निरीक्षकांनी या विभागातून पळ काढला आहे. इमारत निरीक्षक सुधीर जोशी विभागातून बदलून गेले आहेत. सध्या आरेफ खान, शेख कादर, जाधव, गवळी, सय्यद जमशीद यांच्यावर विभागाची भिस्त आहे. सारंग विधाते यांना निलंबित करण्यात आले आहे. १२ इमारत निरीक्षकांची मनपाला गरज आहे.
दैनंदिन कारवाई अशी करावी...
अतिक्रमण हटाव पथकाला दैनंदिन कारवाई करण्यासाठी आठवड्यातील सहा दिवस नेमून देण्यात आलेले आहेत. सोमवार- प्रभाग ‘अ’, मंगळवार- ‘ब’, बुधवार- ‘क’, गुरुवार- ‘ड’, शुक्रवार- ‘ई’, शनिवार- ‘फ’ प्रभागात पथकाने कारवाई करण्याची जबाबदारी नेमून दिली आहे. या आठवाड्यात शहागंज ते सिटीचौक वगळता कोणत्याही प्रभागात पथकाने कारवाई केलेली नाही.
उत्पन्न एकपट खर्च दहापट
अतिक्रमण पथकांवर रोज ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. विभागातील मजूर १५ वर्षांपासून तेथेच कामावर असून, गब्बर झाले आहेत. प्रत्येक वॉर्डातील अतिक्रमणांबाबत मजूरच स्थानिक राजकारण्यांना स्वत:साठी सल्ले देऊन रान मोकळे करून घेतात. पथक कुणाकडून दंड वसूल करते, केल्यास तो दंड मनपाला महसूल रूपाने जमा होतो का, पथक कुठे जाते, याची नोंद होते का, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नाहीत.
सध्या कारवाई बंद
सध्या अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई बंद आहे. कोणत्याही प्रभागात कारवाई करायची नाही, असे अलिखित आदेश पथकाला देण्यात आले आहेत. शहरातील प्रत्येक चौकातील अतिक्रमणाचा दर ठरला असून, त्यानुसार वसुली करण्याचा सपाटा सध्या सुरू आहे.
उपायुक्त म्हणाले
शहागंज ते सिटीचौक या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पथक गुंतलेले आहे. त्यामुळे प्रभाग ‘ई’ कार्यालयांतर्गत अतिक्रमण काढण्यासाठी पथक गेले नसेल, असे उपायुक्त किशोर बोर्डे यांनी सांगितले.
वर्षाला ६०० तक्रारींचा वर्षाव
महापालिका प्रशासनाकडे कार्यालयीन दिवसांच्या काळात रोज किमान २ तक्रारी अतिक्रमण हटविण्यासाठी येत आहेत. महिन्याला ५० तर वर्षाला ६०० तक्रारी मनपाकडे येत आहेत. मागील चार वर्षांमध्ये अंदाजे २ हजार ४०० तक्रारी मनपाकडे आल्या असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला. प्रशासनाच्या आवक-जावक विभागाकडे किमान दोन तक्रारींची रोज नोंद होत असताना स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत अतिक्रमण हटविण्यासाठी ओरड झाल्यावरच पथक कारवाईसाठी आगेकूच करते.
मनपाच्या भूखंडावरच अतिक्रमणे...
मनपाच्या अंदाजे ७०० कोटी रुपयांच्या भूखंडांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. ते भूखंड त्यांच्या तावडीतून मुुक्त करण्यासाठी अतिक्रमण हटाव पथक कारवाई का करीत नाही, असा प्रश्न आहे.
सर्वाधिक ‘अ’ प्रभागातील आरक्षित भूखंड अतिक्रमित झाले आहेत. ‘अ’ प्रभागात जुने शहर येते. त्यानंतर ‘ब’ प्रभागातील ११ भूखंड अतिक्रमित झाले आहेत. सिडकोचा भाग या प्रभागात येतो. ‘ड’ प्रभागातील ११ भूखंड अतिक्रमित झाले आहेत.
मोहीम कागदावरच
मनपा मालकीच्या ५२९ पैकी ६३ भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे.
मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त किशोर बोर्डे, उपअभियंता बी. के. गायकवाड व कर्मचारी एप्रिल-मे २०१४ च्या पहिल्या आठवड्यापासून मोहीम राबविणार होते.
मात्र, त्या मोहिमेला काही मुहूर्त लागला नाही. अतिक्रमित भूखंड भूमाफियांच्या तावडीतून सुटणार केव्हा, असा प्रश्न आहे.
३३ पैकी ३० चौकांत अतिक्रमण
शहरातील ३३ पैकी ३० चौकांमधील फुटपाथवर अतिक्रमण झालेले आहे. या अतिक्रमणाला अभय कुणाचे आहे. तर उत्तर येईल मनपातील हप्ते गोळा करणाऱ्या काही वरिष्ठ आणि कनिष्ठांचे. वाहतुकीला अडथळा करण्यास जबाबदार ठरणाऱ्या अतिक्रमणाला अभय दिल्यामुळे दोन दिवसांपूर्वी सराफ्यांनी बंद पुकारून मनपाचा निषेध केला. त्यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने नाटकी कारवाई करून व्यापाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली.
दोन पथकांसाठी ४० लेबर नेमण्यात आले आहेत. सहा इमारत निरीक्षक विभागात आहेत.
पोलीस व कर्मचाऱ्यांवर वर्षाला दीड कोटी रुपये खर्च होतो.२२ पोलिसांचा फौजफाटा मनपाकडे आहे. २ मोठी वाहने, दोन टाटा सुमो पथकात आहेत.
पथक क्र.१
२५ जुलैच्या सकाळपासून पथकाने आज काहीही कारवाई केली नाही. दुपारी १ पथक बाहेर पडले. ते शहागंजमध्ये गेल्याचे समजताच सदर प्रतिनिधीने पाठलाग केला. ते पथक शहागंजमध्ये गेले. गर्दी असल्यामुळे पथकाने वाहन एका ठिकाणी लावून काही वेळ टाईमपास करून ते पुन्हा पालिकेत आणून उभे केले.
पथक क्र.२
दुसऱ्या पथकाचे वाहन मनपाच्या मागील नाल्याशेजारी उभे होते. पथकातील कर्मचारी दुपारीच वाहन लावून गेले होते. ४ वाजता पहिल्या पथकाचे वाहन येताच दुसऱ्या पथकाचे वाहनही इमारत क्र.३ मध्ये आणून उभे करण्यात आले. त्यानंतर कर्मचारी निघून गेले.
पोलीस पथक
पालिकेला दोन वर्षांपासून २२ पोलिसांची टीम दिली आहे. पोलीस निरीक्षक, महिला व पुरुष कॉन्स्टेबलचा त्यात समावेश आहे. या पथकाचे वाहनही इमारत क्र.३ मध्ये सावलीला उभे होते.

Web Title: The encroachment was removed by the squad's heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.