न्यायालयाच्या आदेशानुसार जूनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

By Admin | Updated: May 29, 2014 00:32 IST2014-05-29T00:06:58+5:302014-05-29T00:32:55+5:30

विठ्ठल कटके , रेणापूर उच्च न्यायालयच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन ग्रामपंचायतीने १ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या ११०२ गटावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० पोलिसांची मागणी केली आहे.

Encroachment removal campaign in June, according to the order of the court | न्यायालयाच्या आदेशानुसार जूनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

न्यायालयाच्या आदेशानुसार जूनमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम

विठ्ठल कटके , रेणापूर उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन रेणापूर ग्रामपंचायतीने १ जून रोजी ग्रामपंचायत मालकीच्या ११०२ गटावरील अतिक्रमण काढण्यासाठी ५० पोलिसांची मागणी केली आहे. शिवाय, अतिक्रमण काढण्यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांच्या उपस्थितीत तसा ठरावही पारित करण्यात आल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेला गती येणार आहे. रेणापूर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी अशोक तेरकर, अनुरथ बस्तापुरे, सागर तोडकरी, मुर्गाप्पा खुमसे, प्रभाकर हलकुडे यांनी मागील तीन-साडेतीन वर्षांपासून आंदोलने केली. या संदर्भात प्रशासनाकडे निवेदने दिली. परंतु, ग्रामपंचायतीने मात्र या मागणीकडे लक्ष दिले नाही. तसेच अतिक्रमण काढण्यासंदर्भात कुठलीही ठोस कार्यवाही केली नाही. तरीही आंदोलनकर्त्यांनी मात्र लढा सुरूच ठेवला. परिणामी, अशोक तेरकर यांनी महाराष्ट्र शासनाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, रेणापूर ग्रामपंचायत, ग्रामविकास अधिकारी व इतरांविरुद्ध उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद न्यायालयात ५२५२/२०१० अन्वये जनहित याचिका दाखल केली. सदर याचिकेवरून न्यायालयात ३ फेब्रुवारी २०१४ रोजी सुनावणी व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होऊन ग्रामपंचायत मालकीच्या सरकारी जागेवरील अतिक्रमण चार महिन्यांत काढून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचा आदेश पारित करण्यात आला. या आदेशाला चार महिने पूर्ण झाल्यामुळे रेणापूर ग्रामपंचायतीने या आदेशाची दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊ नये म्हणून ग्रा.पं. मालकीच्या गट नं. ११०२ मधील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. हा ठराव दादाराव कांबळे यांनी मांडला. तर कांताबाई राठोड यांनी त्याला अनुमोदन दिले. १ हेक्टर ६१ आर जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची... गट क्र. ११०२ मध्ये १ हेक्टर ६१ आर एवढी जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे. या जमिनीवर ग्रामपंचायत इमारत, रेणापूर पाणीपुरवठ्याची विहीर, जलकुंभ, जलशुद्धीकरण केंद्र, पंप हाऊस, जिल्हा बँकेची इमारत, जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळा आदी इमारती असून, उर्वरित जमिनीवर ७४ लोकांनी मागील काळात दुकाने थाटली होती. त्यात केवळ १८ लोकांनी डब्बे ठोकले. या १८ लोकांनाच ग्रामपंचायतीने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटिसा दिल्या. त्यापैकी सहा जणांनी अतिक्रमणे हटविली असल्याची माहिती सरपंच हरिभाऊ साबदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. १ जून २०१४ रोजी अतिक्रमण हटविण्यासाठी रेणापूर ग्रामपंचायतीने १९ मे च्या पत्रान्वये रेणापूरच्या पोलिस निरीक्षकांकडे ५० पोलिस शिपायांची मागणी केली आहे.

Web Title: Encroachment removal campaign in June, according to the order of the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.