जालना : शहरातील नूतन वसाहत व भाग्यनगरसमोरील उड्डाणपूल अतिक्रमणांच्या विळख्यात सापडला असून या उड्डाणपुलाखाली दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. मात्र नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत असल्याने पालिकेचा अतिक्रमण हटाव पथक गेले कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.भाग्यनगरसमोरून सुरू झालेला उड्डाणपूल नूतन वसाहतमधील तुळजाभवानी माता मंदिरासमोर संपतो. सुरूवातीला या उड्डाणपुलाखाली नगरपालिकेच्या वतीने गाळे बांधण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात याबाबतचा कोणताही निर्णय झाला नाही. भाग्यसमोरील भागात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांची बेकायदा पार्किंग असते. याशिवाय छोट्या टपऱ्या, दुकाने यांचीही संख्या येथे वाढत आहे. काहींनी तर पक्के, सिमेंटचे बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी नगरपालिकेत स्वतंत्र अतिक्रमण हटाव पथक तयार केल्याचे म्हटले होते. परंतु नंतर हे पथक कोठे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या उड्डाणपुलासह पूर्वी ज्या-ज्या भागात अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली, त्या जवळपास सर्वच ठिकाणी पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पंचायत समिती परिसर, संभाजी उद्यान परिसर, नवीन जालना भागातील शिवाजीपुतळा परिसर, मंठा रोड, भोकरदन रोड, अंबड रोड, औरंगाबाद रोड आदी भागांचा समावेश आहे. अंबड रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाखालून शिवनगर, कांचननगर, मम्मादेवीनगर, नुतनवसाहत, राम मंदिर परिसर आदी भागातील जनतेची ये-जा असते. परंतु या पुलाखालील अतिक्रमणामुळे रहदारीस अडथळा ठरत आहे. शिवाय पावसाळ्याच्या दिवसात याठिकाणी चिखल व पाण्याचे डबके होत असल्याने त्रास होतो. (प्रतिनिधी)याबाबत मुख्याधिकारी दीपक पुजारी म्हणाले, शहरातील सर्वच भागातील अतिक्रमणे हटविण्यात येणार असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यापूर्वी नगरपालिकेने अतिक्रमणधारकांना नोटिसाही बजावलेल्या आहेत, असेही पुजारी यांनी सांगितले.
उड्डाणपुलाखाली अतिक्रमणे वाढली
By admin | Updated: July 20, 2015 00:51 IST