घाटनांदूरच्या बसस्थानकात अतिक्रमण!

By Admin | Updated: May 20, 2014 01:10 IST2014-05-20T00:32:54+5:302014-05-20T01:10:12+5:30

सोमनाथ खताळ, बीड अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील जुन्या बसस्थानकात मागील अनेक महिन्यांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे़

Encroachment at the bus station of Khantanoor! | घाटनांदूरच्या बसस्थानकात अतिक्रमण!

घाटनांदूरच्या बसस्थानकात अतिक्रमण!

सोमनाथ खताळ,  बीड अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील जुन्या बसस्थानकात मागील अनेक महिन्यांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे़ या बसस्थानकात प्रवाशांच्या निवार्‍यासाठी उभारण्यात आलेल्या शेडवरच येथील एका नागरिकाने अतिक्रमण केले आहे़ अनेकवेळा पत्रव्यवहार करून देखील सदरील व्यक्ती अतिक्रमण काढत नसल्याचे राज्य परिवहन महामंडळातील सूत्रांनी सांगितले़ या व्यक्तीला महामंडळातीलच काही अधिकार्‍यांचे अभय असल्याचेही काही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले़ घाटनांदूर येथे दोन बसस्थानके आहेत़ एक गावाच्या बाहेर १ कि.मी. अंतरावर तर दुसरे गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी़ नवीन बसस्थानकापेक्षा जुन्या बसस्थानकातच प्र्रवाशांची अधिक गर्दी असते़ जुन्या बसस्थानकात प्रवाशांच्या निवार्‍यासाठी शेड उभारण्यात आले आहे़ मात्र जे शेड उभारण्यात आले आहे, त्या जागेवरच येथील चंद्रकांत नरहारराव शिंदे यांनी मागील सहा महिन्यांपासून अतिक्रमण केले आहे़ नियमानुसार राज्य परिवहन महामंडाळाला ७ डिसेंबर १९९८ ला बसस्थानकाची जागा रस्त्यात सामील करून घेण्यात आली़ ही जागा रस्त्यात सामील करून घेतली असल्याची नोंदही सहाय्यक भूमी कार्यालयात आहे़ मात्र चंद्रकांत शिंदे यांनी ही जागा आपली असल्याचे तक्रार केली़ राज्य परिवहन महामंडळ आणि चंद्रकांत शिंदे यांच्यातील वाद न्यायालयात गेला़ न्यायालयानेही २९ एप्रिल २०११ रोजी ही जागा बसस्थानकाचीच असल्याचा निकाल दिला़ ही जागा ४७.८० चौ.से.मी. बसस्थानकाला देण्यात यावी, या जागेतील अतिक्रमण काढण्यात यावे असे पत्रही महामंडळ व संबंधित व्यक्तीला दिले असल्याचे महामंडळातील कनिष्ठ अभियंता व्ही़पी़राऊत यांनी सांगितले़ या बसस्थानकाचा मुद्दा आता जोर धरू लागला असून या जागेतील अतिक्रमण न्यायालयाच्या निकालानंतरही हटविण्यास महामंडळातील अधिकारी, पोलिस प्रशासन का टाळाटाळ करीत आहे? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे़ मागील सहा महिन्यांपासून हा खेळ चालू आहे़ याकडे मात्र गांभीर्याने महामंडळाने लक्ष दिले नसल्याचे दिसून येत आहे़ या प्रकरणात महामंडळ का लक्ष देत नाही? पोलीस प्रशासन सहकार्य करीत नाही की महामंडळ पोलिसांमार्फत अतिक्रमण हटविण्यास पुढे येत नाही, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत़ याबाबत विभागीय नियंत्रक पी़बी़नाईक म्हणाले मी नवीन आहे़ संबंधित विभागातील अधिकार्‍यांना विचारून याबद्दल माहिती घेतो़ न्यायालयाच्या निकालानंतर जर कोणी अतिक्रमण करीत असेल तर हा न्यायालयाचा अवमान आहे़ तसेच चंद्रकांत शिंदे यांच्याशी याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही. मागील अनेक दिवसांपासून या बसस्थानकात अतिक्रमण केले असल्यामुळे येणार्‍या प्रवाशांसह परिसरातील विद्यार्थ्यांना बसस्थानकात आल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सात दिवसात जागा खाली करा घाटनांदूरच्या बसस्थानकातील प्रवाशी निवार्‍याची जागा महामंडळाच्या मालकीची आहे, असा निकाल न्यायालयाने दिलेला आहे़ तरी अद्याप तरी आपण जागा मोकळी केलेली नसून हा न्यायालयाचा अवमान आहे, असे पत्र बीडच्या विभागीय कार्यालयाकडून एप्रिल महिन्यात पाठविले आहे़ तरी पत्र मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत ही जागा मोकळी करावी, असे या पत्रात नमूद केले आहे़ सात दिवसात जागा खाली न केल्यास पोलिस संरक्षणात सर्व साहित्य जप्त करण्यात येईल असेही यामध्ये म्हटले आहे़ या पत्राच्या प्रत उपविभागीय अधीक्षक अंबाजोगाई, उपजिल्हा पोलिस अधीक्षक, अंबाजोगाई, पोलिस ठाणे, अंबाजोगाई, तहसीलदार, अंबाजोगाई, ग्रा़पंक़ार्यालय, घाटनांदूर व आगार प्रमुख अंबाजोगाई यांना देण्यात आल्या आहेत़

Web Title: Encroachment at the bus station of Khantanoor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.