बँकांच्या खाजगीकरणाला विरोधात कर्मचारी दोन दिवसीय संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 19:29 IST2021-03-15T19:28:39+5:302021-03-15T19:29:22+5:30
Bank Employees Strike नागरिकांना माहितीपत्रकाचे वाटप करत दिली संपाची माहिती

बँकांच्या खाजगीकरणाला विरोधात कर्मचारी दोन दिवसीय संपावर
औरंगाबाद : बँकांच्या खाजगीकरणाच्या विरोधात सोमवारपासून बँक अधिकारी-कर्मचारी दोन दिवसीय संपावर गेले. शहर आणि ग्रामीण भागात संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद असून, तब्बल ३ हजार बँक कर्मचाऱ्यांनी त्यात सहभाग नोंदविला. या संपामुळे तब्बल ५० कोटींचे बँक व्यवहार ठप्प झाले.
सरकारने आयडीबीआय आणि दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली आहे. याविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे १५ आणि १६ मार्च रोजी संप पुकारण्यात आला आहे. संपात विविध बँक संघटनांनी सहभाग नोंदविला. औरंगाबादेत सिडको, टीव्ही सेंटर, शहागंज, मिल काॅर्नर, पैठण गेट, रेल्वेस्टेशन, सेव्हन हिल, अमरप्रीत चौक, क्रांती चौक यासह शहरातील प्रमुख बँकांसमोर सकाळी १० वाजेपासून बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी गटागटाने उभे राहून नागरिकांना माहितीपत्रकांचे वाटप केले. याद्वारे सार्वजनिक बँकांचे खाजगीकरण झाल्यास काय परिणाम होईल, यासंदर्भात नागरिकांना माहिती देण्यात आली. काळी फीत लावून आणि गळ्यात ‘बँक बचाओ, देश बचाओ’ असे पोस्टर अडकवून कर्मचारी सहभागी झाले होते.
बँक बंद पाहून माघारी
नागरिकांना संपाविषयी कल्पना नव्हती, सोमवारचा पहिला दिवस असल्याने अनेक नागरिक बँकेत येत होते; परंतु तेथे आल्यानंतर बँक बंद असल्याचे पाहून त्यांना परत जावे लागले.
....तर नागरिकांची बचत धोक्यात
बँकांचे खाजगीकरण झाले तर नागरिकांची बचत धोक्यात येईल. नागरिकांनीही संपाला पाठिंबा दर्शविला. संपामुळे जवळपास ५० कोटींचे क्लिअरिंगचे व्यवहार ठप्प झाले, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे देवीदास तुळजापूरकर यांनी दिली.