कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
By Admin | Updated: June 11, 2014 00:24 IST2014-06-11T00:11:38+5:302014-06-11T00:24:42+5:30
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन पाच महिन्यांपासून थकले आहे.

कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
शिरडशहापूर : औंढा तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन पाच महिन्यांपासून थकले आहे. कार्यालयात बिले तयार करण्यासाठी लिपिकाअभावी कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत औंढा येथे तालुका प्रकल्प अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. या कार्यालयात एक तालुका प्रकल्प अधिकारी, एक सेवक, ७ सुपरवायझर व एक लिपिक असे एकूण ९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ५ ते ६ महिन्यांपासून लिपिकचे पद रिक्त आहे. तात्पूरता पद्भार पंचायत समितीचे कर्मचारी सातव यांच्याकडे देण्यात आला होता; परंतु त्यांनी लेखी पत्र देवून काम करण्यास नकार दिला. त्यामुळे या कार्यालयात कर्मचाऱ्यांचे व तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिस यांचे बिले तयार करण्यास कर्मचारी नसल्यामुळे अधिकाऱ्यांचे ५ महिन्यांपासून पगार थकले आहेत.
सध्या सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू असताना पैशांअभावी खरेदी करता येत नाही. तसेच कर्मचाऱ्यांचे एलआयसी हप्ते वेळेवर भरल्या जात नाहीत. उधारी दिलेले दुकानदार एवढे दिवस थांबायला तयार नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रपंच चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याच कार्यालयातंर्गत अंगणवाडीतील मुलांना मिळणारा पोषण आहार महिला बचत गटांकडे देण्यात आला आहे. या बचत गटातील महिला लहान मुलांना दररोज आहार देतात; परंतु त्यांचे मानधनसुद्धा सहा-सहा महिने मिळत नसल्यामुळे त्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगूनही त्याचा उपयोग झालेला नाही. शासनाने या कर्मचाऱ्यांचे पगार महिन्याच्या ५ तारखेपर्यंत बँकेत जमा करावे, अशी मागणी कर्मचारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी केली आहे. (वार्ताहर)