पालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच
By Admin | Updated: July 19, 2014 00:42 IST2014-07-19T00:07:26+5:302014-07-19T00:42:32+5:30
उस्मानाबाद : नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे़ यामुळे शहरी भागातील सेवा-सुविधा कोलमडल्या
पालिका कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच
उस्मानाबाद : नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेला संप शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे़ यामुळे शहरी भागातील सेवा-सुविधा कोलमडल्या असून, नागरिकांचीही हेळसांड सुरू आहे़ दरम्यान, शुक्रवारपासून पाणीपुरवठा, अग्निशमन व सफाई कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग घेतला आहे.
राज्यातील नगर पालिका, नगर पंचायत कर्मचारी तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे १०० टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्यावे, २७ मार्च २००० पूर्वी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत कायम करावे, १९९३ पूर्वी कायम झालेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना अनुकंपा धारकाचा व इतर शासकीय सेवेचा लाभ द्यावा, अनुकंपा धारकांच्या नेमणुकीसाठी स्थायी, अस्थायी पदाची अट न घालता तत्काळ नियुक्ती द्यावी, शैक्षणिक पात्रता व मूळ विकल्प दिल्यानुसार लेखा शाखेत कर प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना समावून घ्यावे आदी १९ मागण्यांसाठी नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे़ चौथ्या दिवशीही संप सुरू असून, या संपात संभाजीराजे निंबाळकर, भारत साळुुंके, डी़व्ही़शास्त्री, भारत विधाते, सुनील कांबळे, थेटे, सुनील उंबरे, रणजित मुंडे, रावसाहेब शिंगाडे, बसवेश्वर पाळणे, भारत रोहिदास, इंद्राळे, सादिक बागवान, बी़एस़शिंदे आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत़ (प्रतिनिधी)
पाणी पुरवठ्यासाठी खासगी कर्मचारी
कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने भूम शहरवासियांची पाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी कर्मचारी पाणीपुरवठ्यासाठी नियुक्त करण्यात आले आहेत़ संप सुरू होईपर्यंत नगर पालिकेने व्यवस्था केल्याचे भूम नगर पालिकेचे गटनेता संजय गाढवे यांनी सांगितले़ तर तुळजापूरसह इतर शहरी भागातही अशाच पध्दतीने सोय करण्यात आली आहे़
नगराध्यक्षा, खासदारांची भेट
तुळजापूर येथील आंदोलनास गुरूवारी नगराध्यक्षा जयश्री कंदले यांनी भेट देऊन भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती़ शिवाय मागण्यांबाबत शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते़ तर शुक्रवारी खासदार रवींद्र गायकवाड यांनी भेट घेऊन आंदोलकांशी चर्चा केली़ त्यावेळी अध्यक्ष संतोष इंगळे, सचिव ज्ञानोबा टिंगरे यांनी मागण्या त्यांच्या समोर मांडल्या़ खा. गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांना सांगितल्या़ तसेच मागण्यांबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले़