वीज वाहिनी कोसळून पाच घरांना आग
By Admin | Updated: June 6, 2014 01:11 IST2014-06-06T00:50:08+5:302014-06-06T01:11:34+5:30
सोयगाव : तालुक्यातील बहुलखेडा येथे उच्च दाबाची वीज वाहिनी तुटून घरावर पडल्याने पाच घरे जळून खाक झाली. विद्युत प्रवाह असलेली लोंबकळणारी तार व घरांना लागलेली

वीज वाहिनी कोसळून पाच घरांना आग
सोयगाव : तालुक्यातील बहुलखेडा येथे उच्च दाबाची वीज वाहिनी तुटून घरावर पडल्याने पाच घरे जळून खाक झाली. विद्युत प्रवाह असलेली लोंबकळणारी तार व घरांना लागलेली आग अशा दुहेरी संकटातून या घरातील वीस जणांना वाचविण्यात गावकर्यांना यश आले. गुरुवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली.
बहुलखेडा येथे सोयगाव-बनोटी रोडलगत असलेल्या वसाहतीत राहणार्या सुभानखॉ लालखॉ पठाण, शरीफ सुभान पठाण, हबीबखॉ पठाण, शेख सलीम शेख ईसा, शेख सत्तार शेख ईसा हे आपल्या परिवारासह बुधवारी रात्री झोपलेले होते.
रात्री अचानकपणे ११ के.व्ही. वीज पोल इन्सुलेटर खराब झाल्यामुळे उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटून त्यांच्या घरावर पडली. यात मोठा स्फोट झाला व पाच घरांना आग लागली. या पाचही घरात २० जण अडकून पडले होते.
घरातील टीव्ही, दोन शिलाई मशीन, पंखा यासह धान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.
या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार नरसिंग सोनवणे, वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तहसीलदार नरसिंग सोनवणे, मंडळ अधिकारी व्ही. टी. जाधव, व्ही.टी. राऊत, तलाठी विजय शेळके यांनी घटनेचा पंचनामा केला, तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी नगराळे यांनी मृत शेळीचा पंचनामा केला. या घटनेत पाच घरांचे १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे तहसील पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे. (वार्ताहर)
शेळीचा मृत्यू; संसारोपयोगी साहित्य खाक
घराला लागलेली आग व बाहेर विद्युत प्रवाह असलेली विद्युत तार लोंबकळत असल्याने घरातील लोकांना बाहेर निघता येत नव्हते. लहान मुले, महिलांनी एकच आक्रोश
केला.
शेतातून घरी येत असलेल्या विनोद जाधव यांना आगीचे लोळ दिसले. त्यांनी इतरांना हाक दिली. विनोद जाधव, विनोद वानखेडे, सिद्धार्थ वानखेडे, महंमद शरीफ, राजमल पवार, रमेश जाधव, समशेर गफूर आदींसह ग्रामस्थांनी आगीतून व विद्युत प्रवाहातून जळीत घरातील लोकांना सुखरूप बाहेर काढले.
सोयगाव उपकेंद्रात संपर्क साधून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. शेख सत्तार, हबीबखॉ पठाण, शरीफ पठाण, सुभानखॉ पठाण हे चौैघे भाजले असून त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. आगीत एका शेळीचा मृत्यू झाला.