जालन्यातील उद्योजकांना वीज कंपनीचा शॉक

By Admin | Updated: December 15, 2014 00:41 IST2014-12-15T00:23:27+5:302014-12-15T00:41:24+5:30

केवल चौधरी ,जालना वीज कंपनीने उद्योजकांना जोरदार शॉक दिला असून उद्योगांसाठी प्रति युनिटचा दर दीड रुपयाने वाढविला आहे. ही दरवाढ पूर्वलक्ष्य प्रभावी असून

The electricity company's shock to Jalna's entrepreneurs | जालन्यातील उद्योजकांना वीज कंपनीचा शॉक

जालन्यातील उद्योजकांना वीज कंपनीचा शॉक


केवल चौधरी ,जालना
वीज कंपनीने उद्योजकांना जोरदार शॉक दिला असून उद्योगांसाठी प्रति युनिटचा दर दीड रुपयाने वाढविला आहे. ही दरवाढ पूर्वलक्ष्य प्रभावी असून उद्योजकांना प्रति महिना एक ते दोन कोटी रुपये जास्ती भरावे लागले आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून ही दरवाढ लागू करण्यात आली. त्यामुळे स्टील उद्योगाला प्रचंड अडचणीत टाकले आहे.
यापूर्वी प्रति महिना ७५० कोटी रूपयांची सबसिडी उद्योग क्षेत्राला मदत म्हणून जाहीर केले होते. त्यामुळे उद्योगांना प्रति युनिट दीड रुपया सवलत मिळाली होती. राज्यात सत्तांतर झाल्याने वीज कंपनीला देण्यात येणारे ७५० कोटी रुपयांचे पॅकेज रद्द करण्यात आले. ही रक्कम वीज कंपनीला अदा करून यापुढे सबसिडी देण्यात येणार नसल्याचे जाहीर केले.
त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात देण्यात आलेल्या सवलतीचे पैसे अदा करण्यात आले. यापुढे ही सवलत दिली जाणार नसल्याने डिसेंबर महिन्यात वीज कंपनीने सर्वच उद्योजकांना नोव्हेंबर महिन्यातील वाढीव वीज बिलाची मागणी करून तात्काळ रक्कम भरणा करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार जालना औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना जवळपास १० ते १२ कोटी रुपये जास्तीचे भरणा करण्याची वेळ आली आहे.
उद्योजकांनी वीज बिलावर मिळणाऱ्या सवलतीचा विचार करून सळईची विक्री केली आहे. त्यामुळे वाढीव वीज बिल भरणा करावयाचा असल्याने आता प्रति टन १ हजार ३०० रूपये तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी बहुतेक उद्योजक आता कारखाने रात्रीच चालवित आहेत. त्यात ५४ पैकी केवळ ८ कारखान्यांचाच समावेश आहे. कारखान्यांनी उत्पादीत केलेला माल खरेदी करण्यासाठी बाजारात ग्राहक नाही. प्रचंड माल कारखान्यांमध्ये साठला आहे. त्यात ही भाववाढ अतिशय वेदनादायक आहे. वास्तविक पाहता सध्या छत्तीसगड ३.५, गुजरात ५.३०, मध्यप्रदेश ६ रूपये दर आहे. मात्र महाराष्ट्रात सध्याचा दर ७.५ रूपये ऐवढा आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात रात्रीच्या वीज वापरात २.५० रूपये प्रति युनिट सवलत दिली जात आहे. ही सवलतही मार्च २०१५ पर्यंतच लागू राहणार आहे. आगामी काळात कारखाने चालविणे अतिशय अवघड काम होणार आहे. त्यासाठी उद्योजकांसमोर दोनच पर्याय आहेत. कारखाने बंद करून अन्य राज्यात स्थालांतरित होणे किंवा वाढीव दराप्रमाणे वीज वापरून उद्योग चालविणे. सध्या कोट्यावधी रूपये खर्च करून उभारण्यात आलेले कारखाने चालविण्याची चिंता निर्माण झाली आहे.४
सध्याच स्टील उद्योग प्रचंड अडचणीत आहे. ही भाववाढ कमी करण्यात यावी, यासाठी आमचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. उद्योजगांवर त्यांनी मेहेरनजर टाकावी, अशी रास्त मागणी आम्ही समोर करणार आहोत.
- किशोर अग्रवाल
४यांनी सांगितले, सध्या एका महिन्यापूरते दिलासा मिळाला आहे. मात्र आगामी काळातील देयकासंदर्भात संभ्रम आहे. वाढीव देयकात वीज कंपनीने अजूनही धोरण जाहीर केले नाही. यात सवलत पूर्वी प्रमाणेच मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- डी.बी. सोनी
४वाढीव वीज दर वाढीमुळे आम्ही प्रचंड तणावात आहोत. सवलतीच्या दरात मिळालेली वीज वापरून तयार करण्यात आलेली सळई कमी दरात विकण्यात आली आहे. आता विलंबाने दरवाढीची घोषणा करण्यात आल्याने आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे.
- सतीश अग्रवाल
४मंदीच्या लाटेत तग धरून सुरू असलेल्या कारखान्यांवर वाढीव वीज बिल वाढीचा मोठा फटका बसला आहे. ही भाववाढ जानेवारी २०१५ पासून अपेक्षीत होती. मात्र वीज कंपनीने गत महिन्यापासून वाढ करून मोठा फटका दिला आहे.
- दिनेश भारूका
४कुशल आणि अकुशल मजुरांवर मोठा उपासमारीची वेळ येणार आहे. मजुरांच्या हाताला काम सध्या कमी झाले आहे. अर्धे मनुष्यबळ कमी करण्याची वेळ कारखान्यांवर आली आहे. हा मंदीचा फटका आहे.
- विशाल अग्रवाल
४कारखानदारांना हा जबर हादरा असून शासनाने यात काहीतरी उपाय योजना करण्याची गरज आहे. त्याशिवाय कारखान्यांना संजिवनी मिळणार नाही.
- अरूण अग्रवाल
४विदेशातून सळईची आवक करण्यामुळे सवलतीची अपेक्षा होती. त्यात ही भाववाढ नक्कीच जोरदार धक्का आहे. ७ रूपये ५० पैसे दर परवडणारे नाही. उत्पादन खर्चात मोठी वाढ होईल.
- घनशाम गोयल
४रात्रीच्यावेळी कारखाने चालविणे हा एकमेव पर्याय असला तरी मोठ्या कारखान्यांना या दरवाढीमुळे अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तूर्त मंदीचा विचार करता भाववाढ मागे घेतली जावी. ही अपेक्षा उद्योजकांनी शासनाकडे व्यक्त करण्याचा निर्णय घेतला.
- सुरेंद्र पित्ती

Web Title: The electricity company's shock to Jalna's entrepreneurs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.