वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
By Admin | Updated: June 19, 2014 23:51 IST2014-06-19T23:51:43+5:302014-06-19T23:51:43+5:30
कळंब : भारनियमन करू नका, असे म्हणत वीज उपकेंद्रात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून धमकी दिल्याची घटना घडली.

वीज कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यास धक्काबुक्की
कळंब : भारनियमनाच्या कालावधीत भारनियमन करू नका, असे म्हणत वीज उपकेंद्रात जाऊन तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यास शिवीगाळ, धक्काबुक्की करून धमकी दिल्याची घटना तालुक्यातील गोविंदपूर येथील उपकेंद्राच्या कार्यालयात मंगळवारी रात्री सात वाजता घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून सातजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील गोविंदपूर येथे वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र व दुय्यम अभियंता कार्यालय आहे. याअंतर्गत परिसरातील देवधानोरा, बोरगाव (खु) आदी गावांना वीज पुरवठा केला जातो. सध्या या गावांना ठरलेल्या वेळापत्रकानुसार भारनियमन करण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी गोविंदपूर केंद्राचे दुय्यम अभियंता बाळकृष्ण मुरलीधर डोके व यांत्रिकी कर्मचारी हे कार्यालयात काम करीत असताना बालाजी बोंदर, सुरेश सुतार, नामदेव बोंदर, दत्ता बोंदर (सर्व रा. देवधानोरा) तसेच नितीन रणदिवे, शरद तनपुरे, विठ्ठल मासाळ (रा. बोरगाव खु), हे कार्यालयात दाखल झाले. त्यांनी भारनियमन बंद करा, असे म्हणून या दोघांनाही शिवीगाळ व धक्काबुक्की करून धमकी दिली, अशी फिर्याद दुय्यम अभियंता डोके यांनी शिराढोण पोलिस ठाण्यात दिली आहे.
यावरून बालाजी बोंदर, सुरेश सुतार, नामदेव बोंदर, दत्ता बोंदर, नितीन रणदिवे, शरद तनपुरे, विठ्ठल मासाळ यांच्यासह इतर दहा ते बारा लोकांविरूध्द भादंवि कलम ३५३, १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोहेकॉ बी. एस. चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)