वीज पडून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: June 5, 2014 00:49 IST2014-06-05T00:46:08+5:302014-06-05T00:49:46+5:30
उस्मानाबाद : बुधवारी दुपारी जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वार्यासह पाऊस झाला.
वीज पडून दोघांचा मृत्यू
उस्मानाबाद : बुधवारी दुपारी जिल्ह्याच्या विविध भागात वादळी वार्यासह पाऊस झाला. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि) येथील युवकाचा तर धारुर येथील १७ वर्षीय तरुणीच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव (सि) परिसरात बुधवारी दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. यावेळी शेतात काम करीत असताना पाऊस आल्याने गोठ्याकडे निघालेल्या प्रशांत उत्तम वाडकर (वय २२) या युवकाच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे तुळजापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे येवती, हंगरगा, आरळी, बोरी, आपसिंगा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. तसेच झाडेही उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी ही झाडे विद्युत तारेवर कोसळल्याने वीज खंडित झाली आहे. दरम्यान, शहरात पुजारी मंडळासमोर बसवंतवाडी येथील राहुल रावसाहेब ताटे (वय २७) हा युवक दुचाकीवरुन जात असताना जोरदार वार्यामुळे दुचाकी घसरुन पडली. दुचाकीस्वार रस्त्यावर पडलेला असतानाच पाठीमागून येणार्या ट्रकने त्याला उडविले. यात त्याचा मृत्यू झाला. उस्मानाबाद शहर व परिसरातही जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील धारुर येथील मनिषा मोहन पवार ही तरुणी कुटुंबियासमवेत शेतामध्ये खुरपणीच्या कामासाठी गेली असता, ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. कळंब तालुक्यातील येरमाळा परिसरातही दुपारी जोरदार पाऊस झाला. राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. परिणामी जवळपास २ कि.मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. लोहारा परिसरातही जोरदार पाऊस झाला असून, यात अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. धनंजय बिराजदार यांच्या आवळा बागेतील २० ते २५ झाडे उन्मळून पडली. अचलेर येथेही तब्बल अर्धातास गारांसह पाऊस झाला. त्याचप्रमाणे परंडा शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. सोनारी येथे विद्युत पोल कोसळले. १० ते १५ दुकानांवर झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. जागोजागी झाडे उन्मळून पडली आहेत. उमरगा तालुक्यातही मुळज, कदमापूर, नारंगवाडी, कवठा, बेटजवळगा, पेठसांगवी, गुंजोटी, चिंचोली आदी गावात पाऊस झाला. (प्रतिनिधी) गारांचा तडाखा वाशी तालुक्यातील तेरखेडा, पार्डी, कन्हेरी, इंदापूर, केळेवाडी या भागात सायंकाळच्या सुमारास वादळी वार्यासह जवळपास अर्र्धातास गारांचा पाऊस झाला. अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. शाळेवरील पत्रे उडाले उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी येथील पांडूरंग माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीवरील पत्रे उडून गेले. यामध्ये शाळेतील कॉम्प्युटर, प्रिंटर, पुस्तके, शैक्षणिक साहित्य आदींचे नुकसान झाले आहे. तसेच तुकाराम माखले यांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून संसार उघड्यावर पडला आहे. हरि क्षीरसागर यांच्याही घरावरील पत्रे उडाल्याने संसारोपयोगी साहित्य भिजले.