लाच घेताना विद्युत अभियंता जेरबंद
By Admin | Updated: May 30, 2014 01:02 IST2014-05-30T00:47:33+5:302014-05-30T01:02:04+5:30
औरंगाबाद : शेतकर्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना महापारेषणचा कनिष्ठ अभियंता उमेश सुदाम शिंदे (३१, रा. कासलीवाल तारांगण, पडेगाव) यास पोलिसांनी रंगेहाथ पकडले.

लाच घेताना विद्युत अभियंता जेरबंद
औरंगाबाद : शेतात सिंगल फेज विद्युत कनेक्शन देण्यासाठी शेतकर्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना महापारेषणचा कनिष्ठ अभियंता उमेश सुदाम शिंदे (३१, रा. कासलीवाल तारांगण, पडेगाव) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील खामगाव शिवारात एका शेतकर्यास विजेचे सिंगल फेज कनेक्शन घ्यायचे होते. त्यासाठी तो महापारेषणच्या पाथ्री येथील कार्यालयात गेला असता कनिष्ठ अभियंता उमेश शिंदे याने त्यास १० हजार रुपये लाचेची मागणी केली. शेतकर्यास लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने औरंगाबादेत येऊन लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठले. तेथे आपली कैफियत मांडली. पोलिसांनी काल बुधवारी पाथ्री येथे जाऊन अगोदर अभियंत्याने लाच मागितल्याची खात्री करून घेतली. कनिष्ठ अभियंता शिंदे याने लाच मागितल्याची खात्री पटल्यानंतर आज गुरुवारी दुपारी १२.१० वाजेच्या सुमारास पोलीस अधीक्षक सं. दे. बाविस्कर,अप्पर पोलीस अधीक्षक भा. ब. पिंगट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सुरेश वानखेडे, आर. डी. चोपडे, निरीक्षक किशोर पवार यांनी फुलंब्री तालुक्यातील खामगाव शिवारात गट. नं. ६९९ मधील शेतात सापळा रचला. ठरल्यानुसार कनिष्ठ अभियंता उमेश शिंदे हा तेथे गेला व शेतकर्याकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जाळ्यात अडकला. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस कर्मचारी सुधाकर मोहिते, दिलीप पाटील, रवींद्र शिरसाठ, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, बाळासाहेब महाजन, संदीप चिंचोले आदींनी परिश्रम घेतले. अभियंता शिंदे यास लाच घेताना पकडल्यानंतर त्याच्याविरुद्ध वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.