तातडीच्या भारनियमनाखाली विजेचा लपंडाव
By Admin | Updated: May 1, 2017 00:34 IST2017-05-01T00:27:42+5:302017-05-01T00:34:10+5:30
जालना : शहरात गत तीन दिवसांपासून भारनियमन होत असल्याने सकाळ तसेच दुपारी वीजपुरवठा बंद असतो.

तातडीच्या भारनियमनाखाली विजेचा लपंडाव
जालना : शहरात गत तीन दिवसांपासून भारनियमन होत असल्याने सकाळ तसेच दुपारी वीजपुरवठा बंद असतो. मात्र तातडीच्या नावाखाली हे भारनियमन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक पाहता शहरात महावितरणने अधिकृत भारनियमनाची सूचना केलेली नाही.
जालना शहरात पाच उपकेंद्रातून सुमारे ४० हजारपेक्षा अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. यासाठी ५० पेक्षा अधिक फिडर आहेत. महावितरणकडून ज्या भागात वसुली कमी तसेच वीज गळती जास्त आहे याचा अभ्यास करून त्या त्या भागात तातडीचे भारनियमन केले जात आहे. सकाळी दीड तास तसेच दुपारी दीड अनेक भागात वीजपुरवठा बंद असतो. यात जुना व नवीन जालना भागातील ज्या वसाहती अथवा प्रभागात वीज गळतीचे प्रमाण अधिक आहे, त्यानुसार भारनियमन करण्यात येत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उन्हाचा पारा ४० ते ४२ अंशांवर जात आहे. त्यातच दुपारी वीज बंद असल्याने नागरिकांचे उकाड्यामुळे हाल होत आहेत.
तातडीच्या भारनियमनाबाबत महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात येत नाही. अचानक वीजपुरवठा बंद होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)