योजना लाभासाठी वयोवृद्धांची दमछाक
By Admin | Updated: May 19, 2014 00:15 IST2014-05-18T23:44:23+5:302014-05-19T00:15:09+5:30
कनेरगाव नाका : आयुष्याच्या सांजवेळी पोटाची भूक विझविण्यासाठी वयोवृद्ध नागरिक धडपड करताना दिसतात.
योजना लाभासाठी वयोवृद्धांची दमछाक
कनेरगाव नाका : आयुष्याच्या सांजवेळी पोटाची भूक विझविण्यासाठी वयोवृद्ध नागरिक धडपड करताना दिसतात. अशा व्यक्तीसांठी शासनाने निरनिराळ्या योजना सुरू केल्या असल्या तरी त्यामध्ये पात्र ठरण्यासाठी त्यांना कागदपत्रांची उठाठेव करावी लागत आहे. या योजनांचा लाभ देण्यासाठी असलेल्या जाचक अटींची पुर्तता करताना ज्येष्ठ मंडळींची प्रचंड दमछाक होत असल्याचे चित्र आहे. हिंगोली तालुक्यातील कनेरगाव परिसरात वयोवृद्ध नागरिक देखील आर्थिक मदतीचा हात मिळवण्यासाठी शासनाच्या योजनांकडे वळत आहेत. मात्र वयाचा पुरावा देण्यासाठी जाचक अटी लागू असून त्या पुर्ण करण्यासाठी वयोवृद्ध लाभार्थ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. समाजातील निराधार वयोवृद्ध व भूमिहीन नागरिकांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील लाभार्थ्यांची संबंधित कार्यालयात लगबग सुरू आहे. श्रावणबाळ योजनेसाठी वयाची ६५ वर्षे पुर्ण असणे गरजेचे असल्याची अट आहे. असे ६५ वर्ष पुर्ण झाल्याचे दाखले जमविण्यासाठी दिवसभर वयोवृद्ध धावपळ करीत आहेत. तसेच शाळा सोडल्याचा दाखला, कोतवाल बुकाची नक्कल, वैद्यकीय अधिकार्यांचा दाखला असेल तर संबंधीत लाभार्थ्यांचे वय योजनेच्या लाभासाठी योग्य असल्याचे मानले जाते. मात्र निरक्षर लाभार्थ्यांनी शाळा सोडल्याचा दाखला आणावा तरी कोठून? असा प्रश्न आहे. शाळा सोडल्याचा दाखला नाही आणि वयाचा दाखला कोणत्याच वैद्यकीय अधिकार्यांकडे सहजासहजी तयार होत नाहीत. अशा स्थितीत अनेक लाभार्थी अडकून पडले आहेत. १९९४-९५ मधील निवडणुक ओळखपत्र अनेक लाभार्थ्यांकडे आहेत. मात्र त्यावेळी अनेकांनी अंदाजेच वय नोंदविले होते. तेव्हाचे अंदाज आता या लाभार्थ्यांनाच नजरअंदाज करून टाकत आहे. काही लाभार्थ्यांना आपला जन्म कुठला? याचीच माहिती नसल्याने कोतवाल बुकाची नक्कलही त्यांना मिळेनासी झाली आहे. परिणामी कनेरगाव नाका परिसरातील अनेक पात्र लाभार्थी वयाचा योग्य पुरावा नसल्याच्या कारणावरून या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले वय कागदावर शोधले जात नसल्याने वृद्धापकाळी शासनाच्या योजनाही दिलासा देणार्या ठरत नसल्याचे चित्र या परिसरात आहे. याकडे तहसील प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) लाभार्थ्यांची अडवणूक कनेरगाव परिसरात वयोवृद्ध नागरिक देखील आर्थिक मदतीचा हात मिळवण्यासाठी शासनाच्या योजनांकडे वळत आहेत वयाचा पुरावा देण्यासाठी जाचक अटी पुर्ण करण्यासाठी वयोवृद्ध लाभार्थ्यांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र आहे