एकनाथांच्या पालखीचे आज प्रस्थान
By Admin | Updated: June 27, 2016 01:04 IST2016-06-27T00:35:53+5:302016-06-27T01:04:17+5:30
पैठण : वारकरी संप्रदायास भागवतरूपी खांब देणारे व संप्रदायाची, समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज होय.

एकनाथांच्या पालखीचे आज प्रस्थान
पैठण : वारकरी संप्रदायास भागवतरूपी खांब देणारे व संप्रदायाची, समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज होय. ‘बये दार उघड’ म्हणत शोषित व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागरूक करणाऱ्या एकनाथांची विचारधारा वारकऱ्यांनी आजही तेवत ठेवली आहे. आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडाभरातून वारकरी नाथांच्या पैठणनगरीत दाखल होत आहेत. सोमवारी (दि.२७) सायंकाळी पैठण येथून पालखीचे प्रस्थान होणार आहे.
पैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४१७ वर्षांचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते, ते नियमित पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्या नंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनी केली आहे.
संत एकनाथ महाराजांनंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना ही प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून निजामाची हद्द पार केली व वारी खंडित होऊ दिली नाही, असे ज्येष्ठ नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले.
प्रस्थानत्रयी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास मान आहे.
राज्यभरातील वारकरी सोयीप्रमाणे या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे पायी रवाना होतात; मात्र संत एकनाथ महाराज यांच्या पालखीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सोयीसुविधा व चांगले रस्ते कधीच मिळाले नाहीत. केवळ पांडुरंगाच्या श्रद्धेच्या बळावर वारी अखंड सुरू आहे .
बीड जिल्ह्यात धनगरवाडी, हाटकर वाडी, गारमाथा हा अत्यंत डोंगराळ भाग असून या ठिकाणी साधा रस्तासुद्धा उपलब्ध नसल्याने डोंगरातील पायवाटेने पालखी रथ ग्रामस्थांना, वारकऱ्यांना हाताने ४ कि़मी.पर्यंत ओढावा लागतो, तर पावसामुळे नदीनाल्यास पूर आल्यास तो ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते. लाडजळगाव ते शेकटा, भगवानगड ते मालेगाव, मिडसावंगी ते मुंगूसवाडी, राक्षसभुवन ते रायमोह, खर्डा ते तिंत्रज, एकबुर्जी, नांगरडोह, रत्नपूर, अनाले, मुंगशी, बीटरगाव, सोलापूर जिल्ह्यात कव्हे ते कव्हेदंड, गवळेवाडी, कुर्डू, कुर्मदास, अरण, करकंब यादरम्यान रस्ते खूपच खराब आहेत.