अठरा महिन्यांत बारा ग्रामसेवक
By Admin | Updated: August 20, 2014 01:50 IST2014-08-20T01:26:15+5:302014-08-20T01:50:59+5:30
कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे.

अठरा महिन्यांत बारा ग्रामसेवक
कळंब : ऐंशीच्या दशकातील मराठी चित्रपटातील अस्सल गावठी राजकारणाच्या कथानकाला साजेल, असं राजकीय ‘नाट्य’ सध्या कळंब तालुक्यातील अनेक गावांत घडत आहे. कधी नेतेगिरीच्या तोऱ्यात तर कधी जातीय स्वरुप देऊन, तर कधी एकमेकांविरुध्द खोट्यानाट्या तक्रारी देऊन राजकीय खुन्नस काढली जात आहे. राजकीय सारिपाटावरील या नव्या खेळीमुळे सर्वसामान्य मात्र बेजार झाल्याचे चित्र आहे. सत्तेच्या साठमारीत गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या खामसवाडीतही हाच प्रकार प्रकर्षाने दिसून येत आहे.
दहा हजार लोकसंख्येचे खामसवाडी गाव लोकसंख्येच्या बाबतीत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोठे शिवार, सुपीक जमीन, पारंपरिक सिंचनावर ऊस शेती, यामुळे गावाला आर्थिक सुबत्ता लाभली आहे. यास पुरक म्हणून येथे दुग्ध व्यवसायही जोपासला जात आहे. रोकडेश्वरी देवीचे जागृत देवस्थान असलेले खामसवाडी गाव तेरणा पट्यातील प्रमुख गाव असून राजकारणाचे ते केंद्रबिंदू मानले जाते. हेच राजकारण गावातील वातावरण बिघडविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे मागील काही दिवसांतील घडामोडीवरुन दिसून येत आहे. मध्यंतरी राजकारणातील स्थित्यंतरे बदलली, संदर्भ बदलले. बदलानुरुप प्रस्थापितांना शह देण्यासाठी नव तरुणांचे नेतृत्व उदयास आले. आणि संघर्षाला सुरुवात झाली. परिणामी तडजोडीच्या आघाड्या आकारास येऊ लागल्या. सत्तेच्या साठमारीत माणूसपण हरवत जाऊन व्यक्तीद्वेष वाढत चालला. यात कोणताच नेता, पक्ष मागे नाही. मात्र बारमाही राजकारणामुळे गावातील वातावरण गढूळ होत आहे. (वार्ताहर)