आठवलेंना हव्यात २० जागा
By Admin | Updated: August 28, 2014 01:40 IST2014-08-28T01:26:54+5:302014-08-28T01:40:20+5:30
लातूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा महायुतीला राजकीय फायदा झाला आहे. त्यामुळे रिपाइंला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत किमान २० जागा सोडाव्यात

आठवलेंना हव्यात २० जागा
लातूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचा महायुतीला राजकीय फायदा झाला आहे. त्यामुळे रिपाइंला होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत किमान २० जागा सोडाव्यात. यापूर्वी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला धोका दिला आहे. सेना-भाजपकडून असा विश्वासघात होऊ नये. शिवाय, सत्तेमध्ये रिपाइंला विविध मार्गे १५ टक्के वाटा देण्यात यावा, अशी मागणी असल्याचे रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी बुधवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले.
खासदार आठवले म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींबरोबर दलित फॅक्टर होता. त्यामुळे ‘न भूतो न भविष्यती’ असे यश महायुतीला मिळाले आहे. विधानसभेतही असेच यश मिळेल. पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीला बोलाविले आहे. त्यांचा फोन आला होता. त्यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत आपण मंत्रिपदाबाबत विचारणार आहोत. भाजप-सेनेचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यांनी लवकरात लवकर जागा वाटप करून मित्र पक्षांना किमान ५० जागा सोडाव्यात. त्यातील २० जागा रिपाइंला सोडाव्यात. लोकसभेच्यावेळी रिपाइंला १ जागा दिली होती. आता विधानसभेला ६ जागा देऊन गुंडाळण्याचा विचार जर त्यांच्याकडून होत असेल तर रिपाइंला वेगळा विचार करावा लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीने रिपाइंला सत्तेत वाटा दिला नाही. त्यांनी छळच केला. त्याचा बदला म्हणून जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले आहे. आता महाराष्ट्राची सत्ताही महायुतीच्याच हाती येईल. सातारा लोकसभेचे तिकीट आम्ही उदयनराजे भोसले यांनाच देऊ केले होते. परंतु, शरद पवारांनी खेळी करीत राष्ट्रवादीचे तिकीट उदयनराजे भोसलेंना दिले. त्यामुळे ही जागा आमची गेली, असेही खा. आठवले म्हणाले.
पत्रपरिषदेला रिपाइंचे राज्य सचिव चंद्रकांत चिकटे, हरिश कांबळे, दिलीप महालिंगे, बाळासाहेब कांबळे, अतिश चिकटे, पप्पू सरवदे, राजाभाऊ वाघ आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)