बिनविरोध निवडणुकीसाठी ईटकूरकरांची संमती
By Admin | Updated: July 20, 2015 00:52 IST2015-07-20T00:36:12+5:302015-07-20T00:52:21+5:30
कळंब : तालुक्यातील ईटकूर येथे पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी रविवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत

बिनविरोध निवडणुकीसाठी ईटकूरकरांची संमती
कळंब : तालुक्यातील ईटकूर येथे पोलिस प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी रविवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत ‘बिनविरोध’ला ग्रामस्थांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शविली. दरम्यान, कोणत्या ‘फॉर्म्युल्या’वर सदस्यांची निवड करायची, यासाठी मंगळवारी पुन्हा ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सद्यस्थितीत ईटकूर ग्रामपंचायतीसाठी बहुरंगी लढतीची शक्यता आहे. यासाठी वेगवेगळ्या आघाड्या आकाराला आल्या आहेत. शिवाय हे गाव संवेदनशील समजले जाते. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत बिनविरोधचा प्रस्ताव समोर आला. यास पोनि सुनील नेवसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून यासाठी पुढकार घेतला. गावात बिनविरोध निवडणुकीसाठी चांगलीच चर्चा सुरू झाल्यानंतर यासाठी रविवारी ग्रामसभा बोलाविण्यात आली. सकाळी येथील हनुमान मंदिरात ही ग्रामसभा पार पडली. यावेळी पोनि सुनील नेवसे, जि. प. सदस्य बालाजी आडसूळ, पं. स. उपसभापती लक्ष्मण आडसूळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष अरूण बावळे, शिवसेनेचे अनिल आडसूळ, भाजपाचे विलास गाडे यांच्यासह विविध पक्षाचे, गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचे आवाहन पोनि नेवसे यांनी केले. तर जि. प. सदस्य बालाजी आडसूळ, उपसभापती लक्ष्मण आडसूळ, हिंदविजय बावळे, तानाजी गंभिरे, पवन आडसूळ, अनिल आडसूळ, भाई बाबूराव जाधव यांनी यास हरकत नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वांची संमती गृहीत धरून याचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी पुन्हा मंगळवारी ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. (वार्ताहर)