शैक्षणिक संगणक साक्षरतेला घरघर

By Admin | Updated: July 1, 2014 01:04 IST2014-07-01T00:22:02+5:302014-07-01T01:04:40+5:30

उमरगा : संगणक प्रयोग शाळांना तज्ज्ञ संगणक प्रशिक्षक मिळत नसल्याने संगणक प्रयोगशाळा धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे.

Educational computer literacy | शैक्षणिक संगणक साक्षरतेला घरघर

शैक्षणिक संगणक साक्षरतेला घरघर

उमरगा : केंद्र शासनाच्या वतीने माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर होण्यासाठी लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोग शाळांना तज्ज्ञ संगणक प्रशिक्षक मिळत नसल्याने संगणक प्रयोगशाळा धूळखात पडून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या शैक्षणिक संगणक साक्षरतेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.
इतर खाजगी संगणक प्रक्षिशण केंद्राच्या तुलनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाच्या जमान्यात संगणक साक्षर होता यावे यासाठी केंद्र शासनाच्या वतीने जि. प. व खाजगी माध्यमिक शाळामधून आयसीटी हा संगणक साक्षरतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम शालेय विद्यार्थ्यांनी गांभीर्याने शिकावा यासाठी दहावी वर्गासाठी ५० गुणांचा पेपर बोर्डाच्या परीक्षेत ठेवण्यात आला. केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान व संगणकीय अभ्यासक्रमाची गावागावातील माध्यमिक शाळा मधून टप्प्याटप्प्याने सुरुवात करण्यात आली.
पहिल्या टप्प्यात जि. प. उमरगा, जि. प. आलुर, ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी या शाळांना आयसीटी च्या लॅब देण्यात आल्या. सन २००८ ते २०१३ या पाच वर्षाच्या कालावधीसाठी देण्यात आलेल्या संगणकीय प्रयोगशाळांची संबंधित गुत्तेदाराकडील जबाबदारी संपुष्टात आली.
प्रतिभा निकेतन मुरूम, श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी, आदर्श विद्यालय उमरगा, सिद्धेश्वर विद्यालय कसगी, लोकमान्य विद्यालय कदेर, जि. प. मुरुम, ज्ञानदीप विद्यालय दाळींब, जयराम विद्यालय नारंगवाडी, ग्रामीण प्रशाला माडज, गांधी विद्यालय केसरजवळगा, यशवंत विद्यालय पेठसांगवी, या शाळांमध्ये दुसऱ्या टप्प्यात संगणक प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या.
प्रारंभी या सर्वच शाळेतील आयसीटी प्रयोग शाळेच्या प्रशिक्षणाची जबाबदारी संबंधित कंत्राटदार कंपनीवर सोपविण्यात आली होती.
कंपनीच्या कराराची मुदत संपल्याने शिक्षण विभागामार्फत संबंधित शाळेतील शिक्षकांना या बाबत प्रशिक्षण देण्यात आले. शिक्षकांनी थेअरीचे प्रशिक्षण अवगत केले असले तरी प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांना पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारीत ‘गुरुजी वर्ल्ड सॉफ्टवेअर’चा कितपत अभ्यास झाला, हे परीक्षांती समजून येणार आहे. (वार्ताहर)
तपासणीअंती आढावा घेणार
केंद्र शासनाच्या वतीने माध्यमिक शाळामधून सुरू करण्यात आलेल्या आयसीटी या संगणकीय प्रयोग शाळा चालविण्यासाठी टप्प्याटप्प्यातील संगणक निदेशकांचा कालावधी संपल्यामुळे शाळेतील इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण देऊन सदरच्या प्रयोगशाळा चालविण्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही शाळामधून शिक्षक उपलब्ध झाले नसल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत सदर प्रयोगशाळा संस्थेच्या ताब्यात देण्यात येऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. मुख्याध्यापकांच्या आगामी बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात येणार असून, बैठकीत विषयसूचीमध्ये याबाबत नोंद करण्यात आली आहे. अचानक शाळांना भेटी देऊन तपासणी अंती आढावा घेण्यात येणार असल्याचे मत जिल्हा उपशिक्षणाधिकारी शिवदास नलावडे यांनी व्यक्त केले आहे.
प्रशिक्षक न्यायालयात
पहिल्या टप्प्प्यात चार हजाराच्या मानधानावर भरण्यात आलेल्या संगणक निदेशकांची मुदत संपल्याने त्यांना कमी करण्यात आले आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, झारखंड, गुजरात या राज्यातील या योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या संगणक निदेशकांना सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी निदेशकांनी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती प्रताप मोरे यांनी दिली.
संगणक धूळ खात
लाखो रुपये खर्च करून विविध शाळा ंमधून उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोगशाळांना तज्ज्ञ प्रशिक्षक मिळत नसल्याने या प्रयोग शाळेतील संगणक वापराविना धूळखात पडून आहेत.

Web Title: Educational computer literacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.