शिक्षणाधिकार्‍यांनी नाकारला पदभार

By Admin | Updated: May 8, 2014 23:12 IST2014-05-08T23:11:08+5:302014-05-08T23:12:43+5:30

शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागावर आरोपाच्या फैरी डागल्यानंतर व्यथित झालेल्या शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी आता पदभार नाकारला आहे़

Education Officer rejected the charge | शिक्षणाधिकार्‍यांनी नाकारला पदभार

शिक्षणाधिकार्‍यांनी नाकारला पदभार

लातूर : लातूर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग नेहमीच कोणत्या न् कोणत्या चर्चेत असतोच़ पाच दिवसांपूर्वीच शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागावर आरोपाच्या फैरी डागल्यानंतर व्यथित झालेल्या शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी आता पदभार नाकारला आहे़ त्यांनी तसा रीतसर अर्ज प्रशासनाकडे पाठविला आहे़ यावर जिल्हा परिषदेने शिक्षण संचालकांना हा अर्ज पाठवून कोणाकडे पदभार द्यायचा, याविषयी गुरुवारी मार्गदर्शन मागविले आहे़ दरम्यान, लाच प्रकरणात अडकलेल्या शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ व अधीक्षक पेठे यांची बदली झाली असून, त्यांना बुधवारी जिल्हा परिषदेने कार्यमुक्त केले आहे़ राज्याला शिक्षण पॅटर्न देणार्‍या लातूरच्या शिक्षण विभागामागे काही वर्षांपासून शुक्लकाष्ठ लागले आहे़ एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांमुळे जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन होत चालली आहे़ तत्तकालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळापर्यंत प्राथमिक शिक्षण विभागात सर्व काही आलबेल होते़ याच विभागाने बी़आऱ लगड शिक्षणाधिकारी असताना सर्व शिक्षणा अभियानात राज्याला दिशा देणारे कार्य केले़ सलग दोन वर्षे शिक्षण विभागाने सर्व शिक्षणा अभियानात दृष्ट लागण्याजोगी कामगिरी करीत राज्यात प्रथम तसेच द्वितीय क्रमांक पटकाविला होता़ त्यानंतर आलेल्या शिक्षणाधिकारी जोशी यांचा कार्यकाळही गुणवत्तेच्या बाबतीत चांगलाच राहिला़ परंतु, त्यांच्या कार्यकाळातील शेवटच्या टप्प्यात तुकडी वाटपातील अनियमितता समोर आली अन् येथूनच घर आणि घराचे वासे फिरले़ जोशी यांच्या बदलीनंतर उपशिक्षणाधिकारी वाघमारे, खुडे यांनी प्रभारी पदभार वाहून नेला़ दरम्यान, कैलास दातखीळ यांना शिक्षणाधिकारी म्हणून पहिलीच नियुक्ती लातूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात मिळाली़ मात्र सुरुवातीपासूनच ते चर्चेत राहिले़ काही महिन्यातच दातखीळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले़ त्यांच्यासह अधीक्षक पेठे हेही लाच प्रकरणात अडकले गेले़ यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा आणखीच मलीन झाली़ दरम्यानच्या काळात उपशिक्षणाधिकारी खुडे यांच्यावरही साधनव्यक्तींना दोन महिन्याचे मानधन विनाकरार अदा केल्याचा ठपका ठेवला गेला़ त्यात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोपही झाले आहेत़ सर्वसाधारण सभेने त्यांच्यावर सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता़ अशा पद्धतीने अलिकडच्या काळात प्राथमिक शिक्षण विभाग नेहमीच चर्चेत राहिला आहे़ त्यातच आठवडाभरापूर्वी शिक्षक संघटनांनी विद्यमान शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग, उपशिक्षणाधिकारी खुडे, अधीक्षक प्रवीण गायकवाड यांच्यासह कर्मचार्‍यांवर आरोप करीत मोर्चाची तयारी केली होती़ या आरोपामुळे व्यथीत झालेले शिक्षणाधिकारी सुधाकर तेलंग यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला पदमुक्त करण्याची लेखी विनंती केली आहे़ समजूत काढूनही ते हे पद पुढे चालविण्यास उत्सुक नाहीत़ त्यामुळे गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाने तेलंग यांचा अर्ज शिक्षण संचालकांकडे पाठविला आहे़ शिवाय, कोणाकडे पदभार द्यावा, याविषयी मार्गदर्शनही मागविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी) शिक्षणाधिकारी ते प्राध्यापक़़़़ करीअरची सुरूवात शिक्षणाधिकारी म्हणून झालेल्या कैलास दातखीळ यांना लाच प्रकरण चांगलेच भोवले आहे़ या प्रकरणानंतर रजेवर गेलेल्या दातखीळ यांची बदली औरंगाबाद येथील अँग्लो इंडियन संस्थेत प्राध्यापक म्हणून करण्यात आली आहे़ दरम्यान, याच लाच प्रकरणात अडकलेले अधीक्षक पेठे यांचीही बदली झाली आहे़ त्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात अधीक्षक म्हणून कायम ठेवण्यात आले आहे़ या दोघांच्या बदलीचे आदेश मंगळवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले़ त्यानंतर बुधवारी त्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिली़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे शिक्षणाधिकारी दातखीळ व अधीक्षक पेठे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यासंदर्भात शिक्षण संचालक, सचिव तसेच जिल्हा परिषदेशी पत्रव्यवहार करण्यात आला होता, असे उपाधीक्षक एऩजी़ अंकुशकर यांनी सांगितले़ मात्र त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न होता बदली करून अन्यत्र पदस्थापना देण्यात आली आहे़

Web Title: Education Officer rejected the charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.