‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करील तो...’; बाबासाहेबांच्या प्रेरणादायी मंत्राची पाऊणशे वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:34 PM2022-04-14T12:34:40+5:302022-04-14T12:35:33+5:30

आमखास मैदानावर जन्मदिनी झाला होता बाबासाहेबांचा सत्कार

‘Education is the milk of tiger, whoever feeds it...’ Dr. Babasaheb Ambedkar's inspirational mantra is 73 years old | ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करील तो...’; बाबासाहेबांच्या प्रेरणादायी मंत्राची पाऊणशे वर्षे

‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जो प्राशन करील तो...’; बाबासाहेबांच्या प्रेरणादायी मंत्राची पाऊणशे वर्षे

googlenewsNext

- प्रभुदास पाटोळे
औरंगाबाद :
‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील, तो समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही’ शिक्षणाचे महत्त्व विशद करणारा हा प्रेरणादायी मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुमारे पाऊणशे वर्षांपूर्वी १९४९ मध्ये त्यांच्या जन्मदिनीच औरंगाबादेतून जगाला दिला होता.

प्राप्त माहितीनुसार १९४२ मध्ये बाबासाहेबांनी ‘अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ या पक्षाची बांधणी केली होती. औरंगाबादेतील त्यांच्या अनुयायांनी बाबासाहेबांच्या आदेशानुसार मराठवाडा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे कार्य सुरू केले होते. १९४८-१९४९ मध्ये बाबासाहेबांच्या जन्मदिनी मराठवाडा शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या वतीने आमखास येथील भव्य मैदानावर जाहीर सत्कार करण्यात आला, तसेच बाबासाहेबांचे मराठवाड्यातील अस्पृश्यांच्या वतीने अभीष्टचिंतन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी फेडरेशनचे मराठवाडा अध्यक्ष भाऊसाहेब मोरे, सरचिटणीस माजी आमदार रावसाहेब एन.डी. पगारे, खजिनदार काकासाहेब गणोरकर, आसाराम डोंगरे, दादाराव काळे, सखाराम खाजेकर (लासूर स्टेशन), नारायण जाधव (गणोरी), भागीनाथ वंजारे (वैजापूर) आदींनी पुढाकार घेतला होता.

याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना बाबासाहेबांनी उपस्थितांना जाहीर आवाहन केले होते की, ‘तुम्ही तुमच्या मुलांना प्रथम शाळेत पाठवा. त्यांना चांगले सुसंस्कारित करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते जो प्राशन करील, तो समाजातील आणि समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध बंड करून उठल्याशिवाय राहणार नाही. संघटित राहा. त्यामुळे अन्याय, अत्याचार होणार नाहीत. स्वतःचा उद्धार स्वतःच करा. इतरांच्या ओंजळीने पाणी पिणे सोडून द्या. वाघ, सिंहासारखे राहिल्याने तुमच्या वाट्याला कुणीही जाणार नाही. कोंबड्यांचा कुणीही बळी घेतो. संघटनेशिवाय, एकीशिवाय तुम्हाला दुसरा पर्याय नाही’. सद्य:स्थिती पाहता सुमारे पाऊणशे वर्षांनंतरही बाबासाहेबांचे आवाहन किती सत्य होते, याचा प्रत्यय येत आहे.

Web Title: ‘Education is the milk of tiger, whoever feeds it...’ Dr. Babasaheb Ambedkar's inspirational mantra is 73 years old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.