पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड

By | Updated: December 4, 2020 04:10 IST2020-12-04T04:10:10+5:302020-12-04T04:10:10+5:30

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे राज्य कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पोलिसांना ...

ED raids Popular Front of India office | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर ईडीची धाड

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संस्थेचे राज्य कार्यालय औरंगाबादमधील जुना बायजीपुरा येथे आहे. या कार्यालयावर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पोलिसांना सोबत घेऊन गुरुवारी सकाळी १० वाजता छापा टाकला. तेव्हा कार्यालयात जिल्हा कमिटीचे सदस्य कलीम उपस्थित होते. संस्थेचे जिल्हाध्यक्ष इरफान मिली यांना पथकातील अधिकारी ईश्वर यांनी कॉल करून कार्यालयात बोलावून घेतले. यानंतर इरफान मिली आणि कलीम यांच्याकडून अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली. उच्चशिक्षणासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यासाठी पैसा कोठून येतो? संस्थेचे देणगीदार कोण आहेत? आणि या कार्यालयातून राज्यभरातील किती कार्यालयांवर नियंत्रण ठेवले जाते, यासह अन्य मुद्यांवर चौकशी केली. यावेळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयातील आर्थिक व्यवहारासंबंधी पासबुक, बँक स्टेटमेंट आदी कागदपत्रे, तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांबद्दल असलेली कागदपत्रे जप्त केली. यानंतर पथकाने कलीम यांना शहरातील केंद्रीय जीएसटी कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी केली. कार्यालयात जप्त कागदपत्रांविषयी आणि झडतीबद्दल पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी कलीम यांना सोडून दिले.

======

चौकट

कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी

अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने पीएफआय कार्यालयावर धाड टाकण्यासाठी येताना सोबत पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आणले होते. अचानक ईडीची धाड पडल्याचे कळताच कार्यालयाबाहेर पीएफआय समर्थकांनी गर्दी केली होती.

============

कार्यालय ते रोशनगेट काढला मोर्चा

ईडीचे पथक गेल्यावर आणि ईडीने क्लीन चिट दिल्याचा दावा पीएफआयचे पदाधिकारी कलीम यांनी केला. आम्ही केवळ जनतेच्या हक्कासाठी सरकारविरुद्ध लढतो. आपली ही लढाई पुढेही चालू राहील, असे त्यांनी सांगितले. यानंतर पीएफआयचे पदाधिकारी आणि समर्थकांनी जुना बायजीपुरा ते रोशनगेट असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करीत होते.

====

कोट

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाहून इतरत्र लक्ष वळविण्यासाठी केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर धाड टाकली. आम्ही हाथरस प्रकरण, दिल्ली दंगल आणि एनआरसीविरुद्ध जाहीर आंदोलन पुकारल्याने आमचा आवाज बंद करण्यासाठी ईडीचा वापर सरकार करीत आहे. जनतेच्या हक्कांसाठी कायम लढा देणार आहोत.

-इरफान मिली, जिल्हाध्यक्ष, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, औरंगाबाद

Web Title: ED raids Popular Front of India office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.