महापालिकेत काँग्रेसच्या फिफ्टीला लागले ग्रहण !

By Admin | Updated: December 28, 2014 01:15 IST2014-12-28T01:07:32+5:302014-12-28T01:15:15+5:30

आशपाक पठाण , लातूर प्रभाग ९ अ मधील काँग्रेसच्या बिबी हाजरा पठाण यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने मनपात काँग्रेसच्या फिफ्टीला ब्रेक लागला आहे़ विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत

Eclipse took place in the municipal corporation! | महापालिकेत काँग्रेसच्या फिफ्टीला लागले ग्रहण !

महापालिकेत काँग्रेसच्या फिफ्टीला लागले ग्रहण !



आशपाक पठाण , लातूर
प्रभाग ९ अ मधील काँग्रेसच्या बिबी हाजरा पठाण यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने मनपात काँग्रेसच्या फिफ्टीला ब्रेक लागला आहे़ विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अपक्ष नगरसेवक काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने मनपात फिफ्टी झाल्याचा आनंद काँग्रेसकडून साजरा करण्यात आला होता़ मात्र, पक्ष पदाधिकाऱ्यांचा आनंद जास्त दिवस टिकला नाही़ महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता तिसरी पोटनिवडणूक लवकरच लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे़
लातूर शहर महानगरपालिकेत काँग्रेसचे वर्चस्व आहे़ नगरपालिकेचे मनपात रूपांतर झाल्यावर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४९, राष्ट्रवादी काँग्रेस १३, शिवसेना ६, रिपाइंचे दोन सदस्य निवडून आले़ ७० सदस्य संख्या असलेल्या मनपात काँग्रेसची एकहाती सत्ता असली तरी कामकाजातून तसे दिसत नाही़ सभागृहात विरोधकांपेक्षा सत्ताधारी पक्षातील सदस्यांकडूनच पदाधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची जणू प्रथाच पडली आहे़ प्रभाग क्ऱ ३० मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य पप्पू गायकवाड यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली़ ही पोटनिवडणूक काँग्रेस विरूध्द राष्ट्रवादी अशीच झाली़ राष्ट्रवादीच्या प्राची गायकवाड यांचा पराभव करून काँग्रेसचे पंडित कावळे विजयी झाले़ त्यानंतर प्रभाग १३ मधील काँग्रेसचे नगरसेवक अ‍ॅड़ व्यंकट बेद्रे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्दबातल ठरल्याने त्यांना सदस्यत्व गमवावे लागले़ या प्रभागात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस विरूध्द अपक्ष अशी लढत झाली़
मनपात पक्ष सदस्यत्वाची संख्या ५० होईल, यासाठी माजीमंत्री आमदार अमित देशमुख यांनी स्वत: कॉर्नर बैठका व सभाही घेतल्या़ मात्र, बसपा व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार डॉ़ विजय अजनीकर यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून विजय मिळविला़ पन्नाशी गाठण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस नेतृत्वाला स्वत:ची जागा जिंकण्यात अपयश आले़ विधानसभा निवडणुकीत अपक्ष नगरसेवक डॉ़अजनीकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे मनपात आपली फिफ्टी झाल्याचा आनंद पक्षनेत्यांनी साजरा केला़ मात्र, तो आनंद दोन महिनेही टिकला नाही़ प्रभाग ९ मधून निवडून आलेल्या काँग्रेसच्या बिबी हाजरा खय्युमखान पठाण यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरून त्यांचे सदस्यत्व न्यायालयाने रद्द केले़ ४
बिबी हाजरा पठाण यांना दोनपेक्षा अधिक अपत्य असल्याच्या कारणावरून हे प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले होते़ या प्रकरणी सत्र न्यायालयाने सदस्यत्व रद्द ठरविले होते़ या निर्णयावर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील करण्यात आले आहे़ मात्र, न्यायालयाकडून कोणतेही आदेश न मिळाल्याने आयुक्तांनी प्रभाग क्ऱ९ अ ची जागा रिक्त झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाला कळविले आहे़ त्यामुळे या रिक्त जागेवर लवकरच पोटनिवडणूक लागणार आहे़ तसेच गेल्या काही महिन्यांपासून बैठकीस गैरहजर असलेल्या काँग्रेसच्या आणखी एका नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द होणार असल्याची चर्चा आहे़ मनपात काँग्रेसला पन्नाशी गाठण्यासाठी ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे़

Web Title: Eclipse took place in the municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.