सफरचंद खा आणि डॉक्टरांकडे जा !

By Admin | Updated: August 7, 2014 02:04 IST2014-08-07T01:06:56+5:302014-08-07T02:04:56+5:30

अलीकडच्या काळामध्ये सफरचंद खाऊन दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची वेळ येऊ शकते.

Eat apple and go to the doctor! | सफरचंद खा आणि डॉक्टरांकडे जा !

सफरचंद खा आणि डॉक्टरांकडे जा !

विकास राऊ त  औरंगाबाद
एक सफरचंद खा आणि रोगमुक्त राहा, असे बोलले जाते. मात्र, अलीकडच्या काळामध्ये सफरचंद खाऊन दवाखान्यात अ‍ॅडमिट होण्याची वेळ येऊ शकते. सफरचंद ताजेतवाने दिसण्यासाठी त्यावर लावण्यात येणारे वॅक्स (मेण) आरोग्यासाठी घातक असून, त्याचा सर्रास वापर होतो आहे. शहरात येणारी फळे, त्यांच्या साठ्यांकडे अन्न व औषधी प्रशासन पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्यामुळे फळे पिकविण्याचा व ते रासायनिक प्रक्रियेने टिकवून ठेवण्याचा धंदा शहरात जोरात सुरू आहे.
शहरातील सर्व बाजारपेठांमध्ये सध्या बाहेरून आयात केली जाणारी सफरचंद उपलब्ध आहेत. १८० रुपये किलो भावाने सफरचंदांची विक्री होत आहेत. त्या सफरचंदांवर वेगळ्या प्रकारचे मेण चकाकी येण्यासाठी लावलेले असून ते मेण आरोग्याला हानिकारक असू शकते. कारण ते ज्वलनशील मेण आहे.
ताजे फळ का दिसते
सफरचंद विकत घेताना ती छान लालसर, ताजी चमकदार अशी बघून घेतली जातात. झाडावरून काढून दुकानात ही सफरचंद बाजारपेठेत यायला बरेच दिवस लागतात. असे असतानाही सफरचंद ताजेतवाने कसे दिसतात. कारण विशिष्ट प्रकारचे मेण त्यावर लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चाकू किंवा ब्लेडच्या साह्याने सफरचंदांवर घासले तर ते मेण दिसून येते.
सफरचंदांना नैसर्गिक मेण असते, जेव्हा सफरचंद झाडांवरून काढली जातात. तेव्हा त्यांच्यावर नैसर्गिक मेणांचं आवरण असते. फळातील बाष्प निघून ते शुष्क होऊ नये यासाठी निसर्गाने ती व्यवस्था केलेली आहे. झाडावरून काढलेल्या सफरचंदाला बाजारपेठेपर्यंत येण्यास वेळ लागतो. दरम्यानच्या काळात फळांवरील नैसर्गिक मेण निघून जाते. फळे ताजी दिसावीत यासाठी त्यांच्यावर पुन्हा मेण लावले जाते.
खाद्यपदार्थांवरील मेणाचे प्रकार
फळांवर किंवा चमक येण्यासाठी खाद्यपदार्थांवर लावण्यात येणाऱ्या मेणाचे दोन प्रकार आहेत. यामध्ये नैसर्गिक आणि पेट्रोलियम (कृत्रिम) असे दोन प्रकार आहेत. पेट्रोलियमचा आधार असलेले कृत्रिम मेण असते. नैसर्गिक मेण पामच्या झाडापासून, मधमाशांनी तयारी केलेले मेण असते.
हानिकारक मेणाचा वापर
पेट्रोलियम मेणामध्ये हायड्रो कार्बन असते. पेट्रोलियम मेण आरोग्याला हानिकारक असते. नैसर्गिक मेण कोमट पाण्याने धुतल्यावर फळांवरून ते निघून जाते. मात्र, पेट्रोलियम मेण निघत नाही. ते तसेच फळाला चिकटून राहते. फळे थंड पाण्याने धुतली तरी त्यावरील मेण तसेच राहते. व्यापाऱ्यांनी फळे ताजी दिसण्यासाठी कोणते मेण वापरले आहे. हे सांगणे अवघड आहे.
एफडीएचा दावा असा...
शहरात येणाऱ्या सफरचंदांवर नैसर्गिक मेण लावलेले असते, असा दावा अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी केला.
मनपाने हात वर केले
मनपा सूत्रांनी सांगितले की, अन्न व औषधी प्रशासनाकडे फळांच्या पेढ्या तपासण्याची जबाबदारी २०११ पासून आहे. पालिका सध्या कुठलीही कारवाई करीत नाही.
असा उघडकीस आला प्रकार
सदर प्रतिनिधीने गजानन महाराज मंदिर परिसरात १ किलो सफरचंदांची खरेदी केली. त्या सफरचंदाला मेणबत्तीसारखा वास येत असल्यामुळे ब्लेड त्यावर घासले असता मेण निघू लागले. ते मेण चमचामध्ये गोळा करून जाळले असता ते जळाले. याचा अर्थ शहरात येणाऱ्या सफरचंदांवर पेट्रोलियम बेस मेण लावण्यात येत आहे.
तर जठराच्या आजाराचा धोका...
घाटीतील सर्जन तथा सहायक प्राध्यापिका डॉ. अनिता कंडी म्हणाल्या की, सफरचंदाला चकाकी यावी म्हणून केमिकल पेट्रोजेली लावण्यात येत असेल तर घातक आहे. जेली लावलेले सफरचंद नियमित सेवन केल्यास जठराच्या आतड्यास इजा पोहोचू शकते, तसेच त्याच्या दूरगामी परिणामाचा विचार केल्यास कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो.

Web Title: Eat apple and go to the doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.