ओव्हरलोड वाहनांवर आरटीओ पथकाची भल्या पहाटे कारवाई; लाखोंचा दंड वसूल
By संतोष हिरेमठ | Updated: July 12, 2023 19:06 IST2023-07-12T19:06:00+5:302023-07-12T19:06:34+5:30
आरटीओ कार्यालयाच्या दोन वायूवेग पथकांनी पहाटे चार वाजता वैजापूर येथे धडक कारवाई केली.

ओव्हरलोड वाहनांवर आरटीओ पथकाची भल्या पहाटे कारवाई; लाखोंचा दंड वसूल
छत्रपती संभाजीनगर : आमदारांच्या तक्रारीनंतर बुधवारी पहाटे चार वाजेच्या सुमार आरटीओ कार्यालयाचे पथक वैजापूर परिसरात धडकले. या पथकांनी तब्बल ४४ ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात धडक कारवाई करीत लाखोचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईने परिसरातील वाळू वाहतूक करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.
ओव्हरलोड वाहनांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी आमदार रमेश बोरनारे यांनी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्याकडे केली होती. या तक्रारीनंतर आरटीओ कार्यालयाच्या दोन वायूवेग पथकांनी बुधवारी पहाटे चार वाजता वैजापूर येथे धडक कारवाई सुरु केली. या कारवाईत २० ओव्हरलोड वाहने आणि इतर अशी एकूण ४४ वाहनांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या सर्व वाहनधारकांना तब्बल ११ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी तीन लाख रुपये जागेवर वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित दंड न भरलेली वाहने जप्त करून वैजापूर पोलिस ठाण्यासमोर उभी करण्यात आली. ही कारवाई मोटार वाहन निरिक्षक अमोल खैरनार, संदिप गोसावी, अपर्णा चव्हाण, अश्वीनी खोत, सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक गंगाराम भागडे, ऐश्वर्या कराड, वैष्णवी कांबळे, दिव्या कोळसे, परमेश्वर डांगे, संतोष मांजरेकर या पथकाने केली.