कानाचा पडदा बदलण्याची शस्त्रक्रिया
By Admin | Updated: August 7, 2014 23:31 IST2014-08-07T22:58:08+5:302014-08-07T23:31:44+5:30
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच दोन रुग्णांवर सुक्ष्म व अवघड शस्त्रक्रिया कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ़ तेजस तांबोळी यांनी यशस्वीपणे पार पाडली़

कानाचा पडदा बदलण्याची शस्त्रक्रिया
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदाच दोन रुग्णांवर सुक्ष्म व अवघड शस्त्रक्रिया कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ़ तेजस तांबोळी यांनी यशस्वीपणे पार पाडली़ त्यामुळे त्यांचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कौतुक होत आहे़
मानवाचा कान हा अत्यंत नाजूक भाग आहे़ पाच इंद्रीयांपैकी एक आहे़ कानाचे उद्भवणारे आजार सहसा नाक घशामुळे होतात़ या आजाराकडे नागरिक दुर्लक्ष करतात़ त्यामुळे कान फुटणे, कानातून पाणी गळणे, ऐकायला कमी येणे, चक्कर येणे ही लक्षणे रुग्णामध्ये दिसतात़ याकडे रुग्णांनी दुर्लक्ष करू नये, अशा रुग्णांनी तात्काळ कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे गरजेचे आहे़
परभणी जिल्ह्यात कानावर शस्त्रक्रिया करण्याची सुविधा नसल्याने रुग्णांना नांदेड, औरंगाबाद, लातूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये उपचारासाठी जावे लागत होते़ रुग्णांची ही गैरसोय दूर व्हावी म्हणून जिल्हा रुग्णलायात कानाची दुर्बिन (मायक्रोस्कोप) उपलब्ध झाली आहे़ या दुर्बिनीद्वारे कानाच्या पडद्याचे व कानाचे हाड खराब झालेले असेल त्याची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येते़
या कानाच्या दुर्बिनीद्वारे परभणी येथील दोन रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ़ तेजस तांबोळी यांनी केली़ यामध्ये रुख्मिणीबाई विठ्ठल टोम्पे (वय ४४, रा़ काद्राबाद प्लॉट), व नागनाथ भरतअप्पा फुलमोगरे (रा़ तेली गल्ली, परभणी) यांचा समावेश आहे़ ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गणेश फडणीस, डॉ़ प्रकाश डाके, डॉ़ कालीदास चौधरी, डॉ़ पांडे, डॉ़ काझी यांचे मार्गदर्शन लाभले़ (प्रतिनिधी)
निदान योग्य वेळी करावे
कानाच्या आजाराचे निदान लवकर केल्यास भविष्यात होणारी हानी टाळता येते़ उपचार जर केला नाही तर कायमचा बहिरेपणा येणे, मेंदूमध्ये पू होणे, पाणी जमा होणे यामुळे जीवाला धोका निर्माण होऊ शकतो़
खाजगी रुग्णालयात कानाचा पडदा बदण्याच्या शस्त्रक्रियेसाठी जवळपास २० हजार रुपये खर्च येतो़ परंतु, जिल्हा रुग्णालयात बीपीएल कार्डधारक, रेशन कार्ड व राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत रुग्णांवर मोफत उपचार केले जातात़ तसेच वरील पैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास केवळ ४०० ते ५०० रुपयांत शस्त्रक्रिया केली जाते़
जिल्हा रुग्णालयात कानाची दुर्बिनीद्वारे शस्त्रक्रिया होणार असल्याने जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना अत्यल्प दरामध्ये सुविधा मिळणार आहे़ याचा लाभ रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ गणेश फडणीस यांनी केले आहे़
दुर्लक्ष करू नका- तांबोळी
कान हा अत्यंत नाजूक भाग असून, याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये, सतत कान फुटत असेल तर तात्काळ नजीकच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून योग्य वेळी उपचार घ्यावा व भविष्यात होणारी हानी टाळावी, असे डॉ़ तेजस तांबोळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़