स्त्रियांच्या पंखांना गरूड पंखांच वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:06 IST2021-03-09T04:06:23+5:302021-03-09T04:06:23+5:30
औरंगाबाद : स्त्रियांच्या पंखांना जन्मत:च गरूड पंखांच वरदान लाभले असून या समाजाने तिच्या स्वप्नपूर्तीसाठी खंबीर साथ दिली पाहिजे, ...

स्त्रियांच्या पंखांना गरूड पंखांच वरदान
औरंगाबाद : स्त्रियांच्या पंखांना जन्मत:च गरूड पंखांच वरदान लाभले असून या समाजाने तिच्या स्वप्नपूर्तीसाठी खंबीर साथ दिली पाहिजे, असे प्रतिपादन कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ताराबाई शिंदे स्त्री अभ्यास केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सोमवारी व्याख्यान आयोजित केले होते. विभागाच्या संचालक डॉ. स्मिता अवचार अध्यक्षस्थानी होत्या. ‘महिला सक्षमीकरण आणि आजची स्त्री‘ या विषयावर कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी व्याख्यान दिले. यावेळी त्या म्हणाल्या, महिला दिनाच्या अनुषंगाने जगभर विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. आजचा हा दिवस समाजासाठी चिंतनाचा तसेच महिलांसाठी गौरवाचा दिवस आहे. स्त्री ही निसर्गत:च सहनशील आहे. ती कर्तृत्ववान आहे. ती अबला कधी नव्हतीच. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सहभाग असतो, किंबहुना या समाजात घडलेले अनेक महापुरुष स्त्रीमुळे घडले असल्याचे वास्तव आहे. महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे.
अध्यक्षीय समारोपात डॉ. स्मिता अवचार म्हणाल्या, स्त्री अभ्यास केंद्र आणखी सक्षम करून त्याद्वारे विविध उपक्रमांचे आयोजन केले जावे.
प्रास्ताविक प्रा. मंजुश्री लांडगे यांनी केले. यावेळी डॉ. निर्मला जाधव, डॉ. सविता बहिरट, अधिसभा सदस्य सुनंदा सरवदे, डॉ. विलास इप्पर, डॉ. मेहरुन्निसा पठाण आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. अश्विनी मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विकास टाचले, संतोष लोखंडे, संजय पोळ आदींनी परिश्रम घेतले.
कॅप्शन : जागतिक महिला दिन कार्यक्रमात कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.स्मिता अवचार आदी.