नगर पंचायतीच्या स्थापनेत दिरंगाई
By Admin | Updated: May 11, 2014 00:08 IST2014-05-10T23:59:39+5:302014-05-11T00:08:36+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात येणार्या फुलंब्री आणि सोयगाव या दोन नगर पंचायतींच्या स्थापनेला प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे.

नगर पंचायतीच्या स्थापनेत दिरंगाई
सुनील कच्छवे , औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने अस्तित्वात येणार्या फुलंब्री आणि सोयगाव या दोन नगर पंचायतींच्या स्थापनेला प्रशासकीय दिरंगाईचा फटका बसला आहे. दोन्ही नगर पंचायती स्थापन करण्यासाठी हरकती आणि आक्षेप मागविण्याचे शासनाचे पत्र जिल्हा प्रशासनाला नुकतेच प्राप्त झाले; मात्र वरिष्ठ स्तरावरून पत्र पाठविण्यात दिरंगाई झाल्यामुळे हरकती आणि आक्षेप मागविण्याची पत्रातील मुदत आधीच संपून गेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता याविषयी नगर प्रशासन खात्याकडे नव्याने मार्गदर्शन मागविले आहे. राज्यात अनेक तालुक्यांच्या ठिकाणी अजूनही ग्रामपंचायतीच कार्यरत आहेत. अशा सर्व तालुक्यांच्या ठिकाणी नगर पंचायती स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने फेबु्रवारी महिन्यात घेतला. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री आणि सोयगाव या दोन नवीन नगर पंचायती स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. या निर्णयानंतर लगेचच नगर प्रशासन विभागाने नवीन नगर पंचायती स्थापन करण्याचा कार्यक्रम तयार केला; परंतु एप्रिलअखेरपर्यंत मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला त्याविषयी पत्रव्यवहार झाला नाही. आता नुकतेच जिल्हा प्रशासनाला नगर प्रशासन विभागाचे पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र ५ मे रोजी आले असून त्यात नवीन नगर पंचायतींच्या स्थापनेबाबतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार १ मार्च ते ३१ मार्च या काळात नागरिकांकडून आक्षेप आणि हरकती मागविण्यात याव्यात असे म्हटले आहे. मात्र ही मुदत पत्र मिळण्यापूर्वीच संपली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर पेच निर्माण झाला असून त्याविषयी जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्य सरकारकडे नव्याने मार्गदर्शन मागविले आहे. नियोजित कार्यक्रमानुसार ३१ मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवून त्यावर सुनावणी घेण्याच्या सूचना पत्रात दिलेल्या होत्या. त्यानुसार एप्रिलअखेरपर्यंत शासनाला सुनावणीचा अहवाल जाऊन मे किंवा जूनमध्ये या नवीन नगर पंचायती अस्तित्वात येण्याची शक्यता होती; परंतु नमनालाच दिरंगाईचा फटका बसल्यामुळे या नगर पंचायती स्थापन होण्यास आणखी काही काळ लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यातील उर्वरित नगर पंचायतींची कार्यवाहीही रखडली राज्य सरकारच्या फेबु्रवारीतील निर्णयाने मराठवाड्यात २२ नवीन नगर पंचायती स्थापन होणार आहेत. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या नगर पंचायतींच्या स्थापनेची कार्यवाही रखडली आहे. नियोजित कार्यक्रमाची मुदत संपल्यानंतर पत्र मिळाल्याने याविषयी कार्यवाही होऊ शकलेली नाही. त्यामुळे विभागीय आयुक्त स्तरावरूनही यासंदर्भात मार्गदर्शन मागविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. नगर पंचायतींची पहिल्यांदाच स्थापना औरंगाबाद जिल्ह्यात पैठण, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, गंगापूर आणि खुलताबाद या सहा ठिकाणी नगर परिषदा आहेत. याशिवाय सातारा येथे नव्याने नगर परिषद स्थापन होण्याची कार्यवाही सुरू आहे. फुलंब्री आणि सोयगाव येथे जिल्ह्यात पहिल्यांदाच नगर पंचायती स्थापन होत आहेत.नगर परिषद आणि नगर पंचायत या दोन्हींच्या दर्जात थोडासा फरक असला तरी दोन्हींसाठी १९६५ सालचा एकच कायदा लागू आहे.