काेरोनाकाळात घटली ८० टक्के रुग्णसंख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:08 IST2021-01-08T04:08:51+5:302021-01-08T04:08:51+5:30
श्यामकुमार पुरे सिल्लोड : मार्चपासून आजपर्यंत सिल्लोड तालुक्यात कोरोनाचे एक हजारपेक्षा अधिक रुग्ण पुढे आले असून, त्यापैकी २९ जणांचा ...

काेरोनाकाळात घटली ८० टक्के रुग्णसंख्या
श्यामकुमार पुरे
सिल्लोड : मार्चपासून आजपर्यंत सिल्लोड तालुक्यात कोरोनाचे एक हजारपेक्षा अधिक रुग्ण पुढे आले असून, त्यापैकी २९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व चाचणीच्या भीतीने सरकारी रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांची संख्या नऊ महिन्यात कमालीची रोडावली आहे. साधारण दरमहा दहा हजार रुग्णांची नोंद ओपीडीत होत होती. पण कोरोनाच्या काळात हा आकडा आठशे ते हजारपर्यंत आला आहे. नागरिक या काळात आजारी पडले; पण त्यांनी घरीच उपचार घेतल्याचे पुढे येत आहे.
ग्रामीण रुग्णालयात व प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्य नागरिक उपचार घेतात. सिल्लोडसारख्या उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळापूर्वी दरमहा दहा हजार रुग्ण उपचारासाठी येत असल्याची नोंद आहे. यात थंडीताप, व्हायरल, टायफाइड, खोकला आदी आजारांचे अधिक रुग्णांचा समावेश आहे. नऊ महिन्यांच्या काळात साडेतीन लाख लोकसंख्या असणाऱ्या सिल्लोड तालुक्यात कोरोनाने २९ बळी घेतले. कोरोना आजार व भीतीपासून नागरिक सावरले असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र; मात्र लग्नकार्यातील उसळणारी गर्दी खूप काही सांगून जात आहे. मात्र नागरिकांना अजून काही दिवस नियम पाळणे गरजेचे आहे.
------ आजार पळाले की कोरोनाची भीती --------
कोरोनाकाळात बहुतांश नागरिक आजारी पडले हाेते. पण कोरोनाच्या भीतीपोटी नागरिकांनी शासकीय रुग्णालयात जाणे टाळले असल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रुग्णालयात उपचारासाठी गेलो तर संशयित म्हणून डॉक्टरांकडून कोरोनाची चाचणी करण्यात येईल या भीतीने अनेकांनी घरी राहून मेडिकलमधील औषधी घेतल्या असल्याचे चित्र त्या काळात होते. यासह आयुर्वेदिक उपचार, घरगुती नुस्के, विविध काढे घेऊन नागरिकांनी आपली प्रतिकारशक्ती वाढवली.
------- कधी नव्हे इतकी अंड्यांची विक्री----
कोरोना आजारापासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी अनेक पर्याय वापरले. यात बहुतांश नागरिकांनी जे कधी अंडे खात नव्हते त्यांनीसुद्धा या काळात अंड्यांवर ताव मारला. यामुळे अंड्यांची विक्री या काळात सर्वाधिक झाली. अंडे आणि काढा यावरच नागरिकांचा भर होता. परिणामी सध्या अनेकांना मूळव्याधाचा त्रास होत आहे.
- कॉप्शन : सिल्लोडचे उपजिल्हा रुग्णालय.