नांदेड-पुणे गाडीला प्रशासनाचा खोडा

By Admin | Updated: July 21, 2014 00:37 IST2014-07-21T00:24:19+5:302014-07-21T00:37:12+5:30

नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़

Dump administration to Nanded-Pune car | नांदेड-पुणे गाडीला प्रशासनाचा खोडा

नांदेड-पुणे गाडीला प्रशासनाचा खोडा

नांदेड : नांदेड येथून पुण्यासाठी प्रायोगिक तत्वावर विशेष द्विसाप्ताहिक रेल्वे सोडली जात आहे़ या गाडीच्या स्लीपर कोचचे जवळपास सर्वच तिकीट आरक्षित होत असून शेवटच्या दोन दिवसांत तर वेटींग असते़ पुणे गाडीला अशी गर्दी होत असतानाही रेल्वे प्रशासन पुण्यासाठी दररोज गाडी सोडण्याबाबत उदासीन असल्याचे चित्र समोर येत आहे़
नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणीनुसार दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने नांदेड ते पुणे एक्स्प्रेस जुलै महिन्यात गाडी क्रमांक ०७६२२-०७६२१ नांदेड येथून ७, ९, १४, १६, २१, २३, २८ व ३० जुलै रोजी पुण्यासाठी रात्री ९ वाजता तर पुण्याहून नांदेडसाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता पुणे स्थानकाहून गाडी सोडण्यात येत आहे़ या गाडीला प्रवाशांकडून मिळणाऱ्या प्रतिसाद लक्षात घेता पुण्यासाठी दररोज एक एक्स्प्रेस सोडण्यात यावी तसेच ही गाडी सकाळी ७ वाजेच्या अगोदर पुणे येथे पोहोचायला हवी, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे़
ट्रॅव्हल्सचालकाकडून पुणे येथे जाणाऱ्या विद्यार्थी आणि नागरिकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासाठी पुण्यासाठी दररोज एक्स्प्रेस गाडी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीने अनेकवेळा लावून धरली आहेख़ाजगी ट्रॅव्हल्सच्या तुलनेत रेल्वेचे तिकीट अत्यल्प आहे़ त्याचबरोबर प्रवासही आरामदायी होतो़ मात्र, नांदेड येथून सोडली जाणारी गाडी पुणे येथे अवेळी पोहोचत असल्याने अनेकवेळा प्रवासी या गाडीकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे़ पुणे गाडी चालविण्यास उदासीन असलेले रेल्वे प्रशासन याचाच आधार घेत पुण्यासाठी आवश्यक तेवढे प्रवासी मिळत नसल्याचा अहवाल समोर करतात़
सध्या सुरू असलेली पुणे विशेष गाडी पुण्यामध्ये सकाळी किती वाजता पोहोचेल, याचा बेत नाही़ लूज टाईमच्या नावाखाली दोन ते तीन तास गाडी लेट केली जाते़ सदरील गाडी पूर्वीच्या नांदेड - पुणे शटलप्रमाणे वेळेत पोहोचावी, यासाठीचे नियोजन करणे गरजेचे आहे़ पुणे येथे गाडी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पोहोचल्यास या गाडीला निश्चितच गर्दी होईल, अशी अपेक्षा रेल्वे प्रवाशांना आहे़
नांदेड-पुणे गाडीचे सर्वसाधारण तिकीट १४३ रूपये, स्लिपर- ३१५ रूपये, एसी-३ टायरचे ८५० रूपये तर एसी - २ टायरचे १२२५ रूपये तिकीट आहे़ तर खाजगी ट्रॅव्हल्सचालक गर्दीनुसार आपले तिकीट दर ठरवित प्रवाशांची आर्थिक लूट करतात़ सध्या एसी ट्रॅव्हल्ससाठी ७०० ते १२०० रूपये आणि नॉन एसीसाठी ५०० ते ८०० रूपये तिकीट घेतले जात आहे़ ट्रॅव्हल्स वेळेवर पोहोचत असल्याने बहुतांश प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे पसंद करीत आहेत़
रेल्वे प्रशासनाने पुणे गाडीसंदर्भात सकारात्मक भूमिका घेवून सदरील गाडी पुणे येथे सकाळी लवकर पोहोचेल, अशा पद्धतीचे नियोजन करावे, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे अरूण मेघराज यांनी केली आहे़ २००४ मध्ये नांदेड - पुणे ही शटल गाडी पुणे येथे दहा तासांत पोहोचायची़ सध्या सुरू असलेल्या गाडीला पुणे गाठण्यासाठी तब्बल १४ तास लागत आहेत़ जाणीवपूर्वक वेळ वाढवून प्रवाशांना त्रास दिला जात आहे़ तसेच पुणे येथे सकाळी एकही फलाट रिकामा नसतो, हे रेल्वे प्रशासनाने पुढे केलेले कारण चुकीचे असल्याचे मेघराज यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)

Web Title: Dump administration to Nanded-Pune car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.