कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पालिकांचे कामकाज ठप्प
By Admin | Updated: July 16, 2014 00:49 IST2014-07-16T00:22:09+5:302014-07-16T00:49:07+5:30
हिंगोली : राज्यातील २२८ नगरपालिका व तीन महानगरपालिकांमधील कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर गेले असून त्यामध्ये जिल्ह्यातील तिन्ही पालिकांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पालिकांचे कामकाज ठप्प
हिंगोली : राज्यातील २२८ नगरपालिका व तीन महानगरपालिकांमधील कर्मचारी १५ जुलैपासून बेमुदत संपावर गेले असून त्यामध्ये जिल्ह्यातील तिन्ही पालिकांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या संपामुळे पालिकांमधील कामकाज ठप्प झाले होते.
राज्यातील नगरपालिका कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासनाकडून १०० टक्के वेतन देण्यात यावे, नगरपालिकांमधील २००० पूर्वीच्या सर्व रोजंदारी, कंत्राटी कामगारांना विनाअट सेवेत सामावून घ्यावे, अनुकंपाधारकांना तत्काळ नियुक्ती द्यावी, संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती अंशदान व रजा रोखीकरण अंशदान याचा शासनाने तत्काळ भरणा करावा, मुख्याधिकाऱ्यांची ५० टक्के पदे कर्मचाऱ्यांमधून भरण्यात यावीत, सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी तत्काळ देण्यात यावीत आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील २२८ पालिका व तीन महानगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांनी १५ जुलैैपासून बेमुदत संप पुकारला.
हिंगोली नगरपालिकेत राज्याध्यक्ष विश्वनाथ घुगे व जिल्हाध्यक्ष बाळू बांगर, शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचारी दिवसभर धरणे आंदोलन केले. बेमुदत संपामुळे पालिकेतील सर्व कामकाज ठप्प झाले होते. वसमत नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनीही बेमुदत संपात सहभाग नोंदविला. त्यामध्ये अध्यक्ष यु.जी. जाधव, अर्जुन सैैदाने, महिला उपाध्यक्ष पुष्पा भिसे, फकीर पाशा आदींचा समावेश आहे.
कळमनुरी नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. यामध्ये उल्हास राठोड, सचिन वाघमारे, जी.के. वाघ, एस.सी. काळे, नदीम, डी.एन. बोलके, म. जाकेर आदींचा समावेश होता. या आंदोलनामुळे पालिकेतील कामकाज दिवसभर ठप्प झाले होते. (जिल्हा प्रतिनिधी)