महामंडळाच्या आडमुठेपणामुळे प्रवाशांना भुर्दंड
By Admin | Updated: January 28, 2017 00:48 IST2017-01-28T00:46:56+5:302017-01-28T00:48:20+5:30
बीड बिंदुसरा नदीवरील पुलाचा पर्यायी मार्ग सुरू होऊन १५ दिवस उलटले तरीही वाढीव तिकीट दरात उस्मानाबाद विभागाच्या बसेसनी दर कपात केलेले नाही.

महामंडळाच्या आडमुठेपणामुळे प्रवाशांना भुर्दंड
राजेश खराडे बीड
शहरालगतच्या बिंदुसरा नदीवरील पुलाचा पर्यायी मार्ग सुरू होऊन १५ दिवस उलटले तरीही वाढीव तिकीट दरात उस्मानाबाद विभागाच्या बसेसनी दर कपात केलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आजही ६ रुपये वाढीव दराचा फटका सहन करावा लागत आहे. केवळ बीड-उस्मानाबाद विभागाच्या अवमेळामुळे प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे.
बिंदुसरा नदीवरील पुलाच्या दुरवस्थेमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून जड वाहनांची वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली होती. ५-६ कि.मी. अंतर वाढल्याने तिकीट दरात एक टप्पा वाढ झाली. परिणामी प्रवाशांना ६ रुपये अधिकचे मोजावे लागत असत. मात्र, पुलालगतचा पर्यायी मार्ग १३ जानेवारीपासून खुला करण्यात आला आहे. या पुलावरून पूर्ववत वाहतूक सुरू झाली असली तरी वाढीव तिकीट दराकडे महामंडळाने दुर्लक्ष केले आहे. आजही उस्मानाबाद विभागाच्या सर्व बसगाड्यांमधून वाढीव तिकीटदर आकारले जात आहेत. दिवसाकाठी उस्मानाबाद विभागाच्या बीडमधून जवळपास २४ फेऱ्या होतात. बस आसन क्षमतेनुसार जवळपास ६ हजार रुपये प्रवाशांच्या खिशातून काढले जात आहेत.
या आडमुठ्या धोरणामुळे प्रवासी व वाहकांमध्ये अनेक वेळा वादही निर्माण झाले आहेत. तिकीट दरवाढ झाली असल्याचे सांगत वाहकांनी वेळकाढूपणा केला आहे. वाढीव तिकीट दराविषयी उस्मानाबाद विभागात अनेक वेळा तक्रार दाखल करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. केवळ परांडा आगारानेच दरकपात करून तिकीट पूर्ववत आकारण्यात येत आहे.