युवकाच्या दक्षतेमुळे आई-मुलाची भेट
By Admin | Updated: January 7, 2015 01:00 IST2015-01-07T00:57:11+5:302015-01-07T01:00:09+5:30
उस्मानाबाद : घरातून निघून गेलेला एक १६ वर्षीय मुलगा बार्शी येथील युवक व पोलिसांच्या प्रयत्नातून २४ तासात आईच्या कुशीत विसावला आहे़

युवकाच्या दक्षतेमुळे आई-मुलाची भेट
उस्मानाबाद : घरातून निघून गेलेला एक १६ वर्षीय मुलगा बार्शी येथील युवक व पोलिसांच्या प्रयत्नातून २४ तासात आईच्या कुशीत विसावला आहे़ बार्शी येथील एका युवकाने दाखविलेली सतर्कता आणि पोलिसांची तत्परता यामुळेच हा मुलगा पुन्हा कुटूंबात परतण्यास मदत मिळाली.
शहरातील बार्शी नाका परिसरातील एक १६ वर्षीय मुलगा घरात किरकोळ तक्रारी झाल्यानंतर रागाच्या भरात घरातून निघून गेला होता़ त्या मुलाने घर सोडल्यानंतर बार्शी येथील रेल्वे स्थानक गाठले़ तेथून तो मिरजकडे जाणाऱ्या रेल्वेत बसला होता़ रेल्वेत प्रवास करीत असलेल्या असलेल्या आकाश सुनील गायकवाड (रा़बार्शी) या युवकाने त्या मुलाकडे सहज विचारपूस केली़ प्रारंभी माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुलाने त्याला माहिती दिली़ घटना समजल्यानंतर आकाश गायकवाड याने त्याच्या घरचा मोबाईल नंबर घेवून त्यांच्याशी संपर्क साधला़ माणुसकीच्या नात्याने तो मुलगा आईच्या कुशीत परत जावा, त्याचा राग शांत व्हावा यासाठी त्याची तो समजतूत घालत होता़ मोबाईल घेवून त्याने घरी त्याच्या आईशी संपर्क साधला़ घरातील मोबाईलवर फोन येईपर्यंत त्याच्या आईलाही आपला मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती नव्हती़ अचानक फोन आला आणि मुलगा पंढरपूर येथे आहे, असे सांगितले असल्याने त्याची आई घाबरून गेली होती़ त्यांनी तत्काळ शहर पोलीस ठाणे गाठले़ ठाण्यात असलेले सपोउपनि. विशाल शहाणे यांना त्या मातेने माहिती दिली़ शहाणे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, सपोनि राजेंद्र बनसोडे यांना माहिती दिली़ तसेच तत्काळ शहाणे यांनी आकाश गायकवाड यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला़ त्या लहान मुलाला मिरज पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितले़ तसेच मिरज पोलिसांना याची माहिती दिली़ आकाश गायकवाड याने त्यानंतर त्या मुलाला मिरज पोलिसांच्या ताब्यात दिले़ त्याची पोलिसांकडून पूर्ण माहिती मिळाल्यानंतर त्याची आईही त्याला घेण्यासाठी मिरजकडे धावली़ मंगळवारी सायंकाळी तिचा घरातून गेलेला मुलगा पुन्हा आईच्या कुशीत आला़ आकाश गायकवाड याने दाखविलेली माणुसकीतील तत्परता आणि पोलिसांनी वेळीच संपर्क साधून केलेले योग्य मार्गदर्शन यामुळे घरापासून दूरावणारा मुलगा परत त्याच्या आईकडे आला़ आकाश गायकवाड आणि पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)