जिल्ह्यात ५९ गावांवर टंचाईचे सावट
By Admin | Updated: June 29, 2014 00:45 IST2014-06-29T00:42:57+5:302014-06-29T00:45:39+5:30
जालना : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रता वाढत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत.
जिल्ह्यात ५९ गावांवर टंचाईचे सावट
जालना : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रता वाढत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात २५ गावे आणि ८ वाड्यांमध्ये ३१ टँकर सुरू आहेत. तर ५९ गावे आणि १० वाड्यांमध्ये टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. १५ जुलैपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास उपाययोजनांसंदर्भात निधी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आकस्मिक आराखडा पाठवावा, असे आदेश शासनाने दिले आहेत.
जून महिना संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस आलाच नाही. शहरी व ग्रामीण भागात लोक पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात पेरणीची कामे खोळंबली असून बळीराजा चिंतीत झाला आहे. १६ लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले असून बहुतांश जलसाठ्यांमधील पाणीपातळी कमी झाली आहे.
गेल्या महिनाभरापर्यंत जिल्ह्यात टँकरद्वारे १० ते १२ गावांमध्ये पाणीपुरवठा सुरू होता. आता टंचाईग्रस्त गावांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावातील महिला-पुरूषांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सादर झालेल्या टंचाई कृती पुरवणी आराखड्यास जिल्हा प्रशासनाने मंजुरीही दिली होती. मात्र ही उपाययोजना जून २०१४ पर्यंतच असल्याने सद्यस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात टँकरची तसेच विहिरींची अधिग्रहण संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पाणीटंचाई हळूहळू रौद्र रूप धारण करू लागल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. २०१३ मधील भयावह दुष्काळाची आठवण लोकांना होऊ लागली आहे. मात्र शासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील विविध प्रकल्पांतील उपलब्ध जलसाठा आगामी तीन महिने पुरेल एवढा आहे. मात्र पाणी वितरणासाठी प्रशासनाला वेळप्रसंगी तयारी करावी लागेल, अशी चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत संभाव्य टंचाई लक्षात घेता करावयाच्या उपाययोजनांचा ‘आकस्मिक आराखडा’ तयार करण्याचे आदेश शासनाने जिल्हा प्रशासनाला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
निवारणास मुदतवाढ देण्याची मागणी
भूजल सर्वेक्षण विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद यांच्या एका पथकाने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात १५ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५९ गावे व १० वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या सचिवांसमवेत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सींमध्ये जिल्हाधिकारी २ नायक यांनी जिल्ह्यात टंचाई निवारण कृती कार्यक्रमाला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील जलसाठ्यांमधील पाणी हे पिण्यासाठीच वापरण्यात येणार आहे.