पावसाने फेरले पाच लाख हेक्टर पेरण्यांवर पाणी
By Admin | Updated: July 3, 2014 00:16 IST2014-07-02T23:20:32+5:302014-07-03T00:16:41+5:30
दिनेश गुळवे, बीड यावर्षी पुन्हा दुष्काळाचा फेरा पडला आहे. पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. ‘

पावसाने फेरले पाच लाख हेक्टर पेरण्यांवर पाणी
दिनेश गुळवे, बीड
यावर्षी पुन्हा दुष्काळाचा फेरा पडला आहे. पावसाने तोंड फिरविल्याने शेतकऱ्यांचा जीव कासावीस होऊ लागला आहे. ‘आता तरी पाऊस पाड रे बा विठ्ठला’ अशी आर्त हाक शेतकरी विठ्ठलाकडे करू लागला आहे. पाऊस नसल्याने तब्बल पाच लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबलेल्या आहेत. गेल्यावर्षी जून अखेर जिल्ह्यात अडीच लाख हेक्टर पेरण्या झाल्या होत्या. यावर्षीमात्र अद्याप शेतकऱ्यांनी ‘चाड्यावर मूठ’ धरलेलीच नाही.
बीड जिल्ह्यात ५ लाख ६२ हजार ७०० हेक्टर क्षेत्र खरीप पेरणीची आहे. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तूर, उडीद, बाजरी, ज्वारी, तीळ आदी पिकांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. गेल्यावर्षी पावसाचे प्रमाण मुबलक होते. गतवर्षी जून अखेर १३३ मि.मी. पाऊस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने दडी मारली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ ३३ मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्याप पावसाची एकही सर पडलेली नाही. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असते. कापूस शेतकऱ्यांसाठी ‘पांढरं सोनं’ असल्याने शेतकरी रात्रंदिवस मेहनत घेऊन कापसाची लागवड करतात. गेल्यावर्षी कापसाचे उत्पन्न समाधानकारक झाल्याने शेतकऱ्यांकडे चार पैसे शिल्लक होते. यातून शेतकऱ्यांनी मशागतीसह बियाणे खरेदीही केली आहे. जिल्ह्यातील शेतीच्या मशागती पूर्ण झाल्या असून पेरणीसाठी शेतकऱ्यांची डोळे आकाशाकडे लागली आहेत. मात्र आता महिना होत आला तरी पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यात केवळ ६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झालेली असून इतर पिकांचीही सहा हजार हेक्टरवर पेरणी झालेली आहे. शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पाणी आहे. या पाण्यावर ठिबकद्वारे ही लागवड झालेली आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी १ जुलै पर्यंत २ लाख ४५ हजार ९०० हेक्टरवर लागवड झाली होती. ही पेरणी एकूण पेरणी क्षेत्राच्या ४४ टक्के झाली होती. यामध्ये कापूस, खरीप ज्वारी, बाजरीसह इतर पिकांचा समावेश असल्याचे कृषी विभागातील बिनवडे यांनी सांगितले.
गेल्या वर्षी जिल्ह्यात १ जुलैपर्यंत उडीद, भात व तीळ या पिकांचा पेराही बऱ्यापैकी झाला होता. या वर्षी या पिकांचा पेरा रखडला आहे.(भाग-२)
वाण गतवर्षीची पेरणी (क्षेत्र हेक्टर मध्ये) यावर्षीची पेरणी
कापूस १ लाख ५२ हजार ५०० हे. ६ हजार ५१९
सोयाबीन ३८ हजार ५०० ३ हजार ९४५
तूर ११ हजार ५०० ७००
उडीद ३ हजार ३०० ००
मूग ३ हजार ५०० ७६ हे.
भात ३०० ००
बाजरी २५ हजार ६०० ३००
तीळ ४०० ००
ज्वारी ५ हजार ८०० १ हजार १००
पुरेशा पावसावरच लागवड करावी
जिल्ह्यात आतापर्यंत पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोड्या ओलीवर पेरणी करू नये. पुरेशी ओल नसेल तर दुबार पेरणीची वेळ येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधानकारक पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय मुळे यांनी व्यक्त केले.