बाबासाहेबांच्या राष्ट्रवादामुळेच दलित नक्षलवाद नाही
By Admin | Updated: April 14, 2016 00:59 IST2016-04-14T00:52:01+5:302016-04-14T00:59:15+5:30
उस्मानाबाद : बाबासाहेबांचा राष्ट्रवाद दलितमुक्तीपासून सुरू होवून मानवमुक्तीपर्यंत जातो. त्यांनी आयुष्यभर सर्वप्रथम या देशाच्या हिताचा विचार केला

बाबासाहेबांच्या राष्ट्रवादामुळेच दलित नक्षलवाद नाही
उस्मानाबाद : बाबासाहेबांचा राष्ट्रवाद दलितमुक्तीपासून सुरू होवून मानवमुक्तीपर्यंत जातो. त्यांनी आयुष्यभर सर्वप्रथम या देशाच्या हिताचा विचार केला. त्यांच्या या शंभर नंबरी राष्ट्रवादामुळेच देशात दलित नक्षलवाद निर्माण झाला नाही. याबाबत बाबासाहेबांचे आपण ऋण व्यक्त केले पाहिजेत, असे सांगत शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी झटणाऱ्या बाबासाहेबांचे ‘मॉडेल’ सध्याच्या राजकारण्यांनी स्वीकारण्याची आवश्यकता असून, ते मॉडेल राजकारणी स्वीकारणार नसतील तर त्यांना बाबासाहेबांच्या तसबिरीला हार घालण्याचाही अधिकार नाही, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचच्या वतीने बुधवारी आयोजित व्याख्यानमालेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय योगदान’ या विषयावर डॉ. श्रीपाल सबनीस यांनी दुसरे पुष्प गुंफले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तानाजी ठोंबरे होते. डॉ. आंबेडकरांची १२५ वी जयंती यावर्षी ‘युनो’च्या माध्यमातून जगभर साजरी होत आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सबनीस यावेळी म्हणाले. बाबासाहेबांच्या कतृत्वाची लांबी-रूंदी मोजता येणार नाही. मात्र, एकच माणूस अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कामगार नेता, मजुरांचा कैवारी, घटनातज्ज्ञ यासह इतर बाबीत प्रवीण होता. त्यांच्या या इतर पैलूंचाही अभ्यास होण्याची गरज आहे. हिंदू स्त्रियांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांना रोखण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल मांडले. याचबरोबर देशातील ओबीसी समाजबांधवांना सवलती मिळवून देण्यासाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली. मात्र, या दोन्ही बाबी सरकारने मान्य न केल्याने बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९३५ पर्यंत आंबेडकर हिंदू होते, मात्र बाबासाहेबांचा हिंदूनिष्ठ समतावाद मान्य केला नाही त्यामुळेच त्यांनी धर्मांतर केल्याचे सांगत धर्माच्या नावावर ज्यांनी बाबासाहेबांसह सात कोटी जनतेला त्रास दिला, त्यांना धडा शिकवायचा ठरविले असते तर त्यांनी बुध्द धम्माऐवजी इतर धर्म स्वीकारला असता. मात्र, बुध्द धम्मात प्रवेश करून त्यांनी सूडचक्र थांबविल्याचेही सबनीस यावेळी म्हणाले.
बाबासाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांचा कैवार घेतला. कोकणातील खोती प्रथेविरूध्द काढलेला मोर्चा हे त्याचेच प्रतिक होते. परंतु, देशातील शेतकरी नेत्यांनाही बाबासाहेब समजले नसल्याचे सांगत आजच्या राजकारण्यांनी आंबेडकरांच्या शेतीविषयक धोरणांचा अभ्यास करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही वर्षात राजकारण्यांच्या खाबुगिरीमुळे १७७ साखर कारखाने आजारी पडले असून, ४२ कारखाने विकण्यात आले आहेत. तर २७ विक्रीच्या तयारीत आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा शेतकऱ्यांची मुले म्हणविणाऱ्या राजकारण्यांनीच केल्याचे सांगत राजकारणी अशा पध्दतीने वागणार असतील तर या देशातील शेतकरी जगणार कसा, असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)