दारूला स्पर्शही नसल्याने किनगावात सौख्याची परंपरा...
By Admin | Updated: June 3, 2014 00:45 IST2014-06-03T00:02:39+5:302014-06-03T00:45:20+5:30
संजीवकुमार देवनाळे , किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नाही.

दारूला स्पर्शही नसल्याने किनगावात सौख्याची परंपरा...
संजीवकुमार देवनाळे , किनगाव अहमदपूर तालुक्यातील किनगाव हे २५ हजार लोकसंख्येचे गाव असून, हे गाव तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असले तरी या गावामध्ये अवैध दारू विक्रीचे एकही दुकान नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिकांमध्ये सौख्याची परंपरा आजही कायम आहे. किनगाव हे लातूर, परभणी, बीड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरचे गाव असून, या तिन्ही जिल्ह्यांतील गावांचा थेट संपर्क किनगावाशी येतो. जिल्ह्यातील अनेक गावांत अवैध दारू विक्री, बिअर बारच्या दुकानासाठी स्पर्धा लागली असली, तरी किनगावमध्ये मात्र वयोवृद्ध व जाणकार मंडळींनी अद्यापही अवैध दारू विक्रीला गावात येऊ दिले नाही. मधुकर मुंढे यांनी १९७७ ते १९९६ दरम्यान, गावच्या लोकप्रतिनिधींची भूमिका सांभाळली. सलग तीनवेळा ते बिनविरोध सरपंच झाले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गरीब लोकांसाठी दीडशे घरे बांधून दिली व त्या घरांना ‘ठाकरेनगर’ असे नाव दिले. याच काळात गावाची बाजारपेठ ओळखून उदगीर येथील एका व्यावसायिकाने अवैध दारू विक्रीचे दुकान चालू करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यावेळीही गावातील लोकांनी त्याला विरोध करून त्याचा उद्देश हाणून पाडण्याचे काम केले. गावातील सामाजिक कार्याने प्रेरित झालेले मधुकर मुंढे, मैनोद्दीन देशमुख, देवेंद्र आमले यांनी गावात अवैध दारू विक्रीला स्थान देऊ नये, यासाठी त्यावेळी आमरण उपोषण केले. पण; त्यांच्या या सामाजिक कार्याला त्यावेळी दाद ना फिर्याद, अशी परिस्थिती झाली. तरीही जिद्दीने कार्य केल्यामुळे शासनाला अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला. त्यानंतर मात्र कोणी तसा प्रयत्न करण्याचेही धाडस केले नाही. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव... अहमदपूर तालुक्यातील किनगावात आनंदात जगणार्या नागरिकांना या अवैध व्यवसायाची दृष्ट लागू नये, या दृष्टिकोनातून ग्रामस्थांनी किनगाव ग्रामपंचायतीमध्ये बहुमताने दारू विक्री कायमस्वरूपी हद्दपार करण्याचा ठराव घेण्यात आला. तसेच बाहेरील कोणी व्यक्ती या उद्देशाने आला तर त्यालाही ग्रामपंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र द्यायचे नाही, असाही निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून गावामध्ये सौख्याची परंपरा राबत असून, तीच परंपरा कायम ठेवण्याचे काम माजी सरपंच त्रिवेणी लव्हराळे, शिवाजी कांबळे, लताताई मुंडे आदींनी केली आहे. तसेच यापुढील कालावधीतही ती परंपरा पुढे सांभाळण्याचे काम सरपंच विठ्ठलराव बोडके करीत आहेत.