चाऱ्याअभावी दूध घटले
By Admin | Updated: August 7, 2014 01:40 IST2014-08-07T01:31:24+5:302014-08-07T01:40:59+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी कमी पाऊस झाला़ कृषी विभागाच्या गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार चार महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे़ त्यातच पावसानेही

चाऱ्याअभावी दूध घटले
बाळासाहेब जाधव , लातूर
गतवर्षीच्या प्रमाणात यावर्षी कमी पाऊस झाला़ कृषी विभागाच्या गतवर्षीच्या पेरणी अहवालानुसार चार महिना पुरेल एवढा चारा उपलब्ध आहे़ त्यातच पावसानेही उघडीप दिल्यामुळे गायी-म्हशींना लागणारा हिरवा चाराही आलेला नाही़ परिणामी, दूध घटले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ७ हजार लिटर्सची घट आहे.
लातूर जिल्ह्यात ६ लाख २३ हजार ३३३ पशुधनापैकी ३ लाख ६८ हजार ८३७ गायी व २ लाख ५४ हजार ४९६ म्हशी आदीचा पशुधनाचा समावेश दुग्धव्यवसायात होतो़ या पशुधनासाठी येत्या वर्षभरात १६ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध होण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाकडून व्यक्त केली जात आहे़ परंतु, २०१४ जुलै अखेरपर्यंत फक्त चार लाख मेट्रीक टन चारा पशुधनासाठी उपलब्ध आहे़ आहे त्या चाऱ्यावर पशुधनाला वर्षभराचा चारा प्रश्न मार्गी लावावा लागणार आहे़
त्यातच पावसाने उघडीप दिल्यामुळे बळीराजाला पशुधनाच्या चारा प्रश्नासाठी अनंत अडचणीला सामोरे जावे लागणार आहे़ पशुधनासाठी १६ लाख मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार असल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाकडून केला जात असला तरी पुरेशा पावसाअभावी चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे दूध देणाऱ्या गायी, म्हशीला हिरवा चारा आॅगस्ट महिन्यापर्यंतही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या प्रमाणात ७ हजार लिटर्स दुधाची घट झाल्याचे समोर आले आहे़
पशुसंवर्धन विभाग दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना दुभत्या गायी, म्हशीच्या संगोपनासाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना आणल्या जात आहेत़ परंतु, पुरेसा पाऊस व हिरवा चारा आलेला नाही़ त्यामुळे या योजनेअंंतर्गत मिळणाऱ्या पशुधनाचे करायचे तरी काय, असा प्रश्न पशुधन लाभार्थ्यांना पडत आहे़सध्या सप्टेंबर अखेरपर्यंत पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. तरी महिन्याकाठी शासकीय दूध डेअरीतून २ हजार ५२८ लिटर्स, खाजगी दूध डेअरीतून १४ हजार ५७४ लिटर्स, तर सहकारी संस्थांकडून ६ हजार ५६३ लिटर्स असे एकूण २३ हजार ६६५ लिटर्स दूध जिल्हाभरातून येते़ परंतु, हिरव्या चाऱ्याअभावी महिन्याकाठी ३ हजार लिटर्स दूधाची घट झाली आहे़